भाव वाढल्याने किचनमधून टोमॅटो गायब!
By admin | Published: July 17, 2017 02:01 AM2017-07-17T02:01:06+5:302017-07-17T02:01:06+5:30
भाजीपाल्याचे भाव गगनाला : गृहिणींचे बजेट कोलमडले
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: भाजीपाला बाजारात टोमॅटोची आवक अचानक मंदावल्याने प्रति किलोचे भाव गगनाला भिडले आहेत. त्याचबरोबर इतर भाजीपालाही महाग झाल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. प्रति किलो ८० रुपयांच्या घरात गेलेला टोमॅटो किचनमधून गायब झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
खामगावात भाजीपाल्यांची गेल्या दोन आठवड्यात आवक मंदावली आहे. विशेष म्हणजे टोमॅटोची आवक नगण्य असल्यामुळे प्रति किलो १२० रुपयांचा भाव सध्या आहे. त्यामुळे टोमॅटो खरेदी करताना प्रति किलोला १२० रुपये गृहिणींना मोजावे लागत आहे. तर इतर भाजीपालाही किमान ६० रुपये किलोच्या घरात आहे. त्यामुळे किचनमधील भाजपाल्यांची संख्या घटली आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक महाग टोमॅटो असल्याने अनेक गृहिणी टोमॅटो खरेदी करणे टाळत आहेत. भाजीपाल्यांच्या प्रति किलोच्या भावात मोठी वाढ झाली असून, यानिमित्त गृहिणींचे किचन बजेट कोलमडले आहे. सदर टोमॅटोची भाववाढ आणखी काही दिवस राहण्याची शक्यता आहे.
आवक घटली...
शहरातील भाजी बाजारात ग्रामीण भागातून दाखल होणाऱ्या भाजीपाल्याची आवक गेल्या दोन आठवड्यांपासून घटली आहे. परिणामी भाजीपाल्याचे भाव दुपटीने वाढले आहे. सर्वाधिक टोमॅटो आणि मिरचीची आवक अल्प असल्यामुळे प्रति किलोचे भाव ५० ते ८० रुपयापर्यंत पोहचले आहेत. त्यामुळे भाजीपाला खरेदी करण्याअगोदर गृहिणींना अर्थकारणाचा विचार करावा लागत आहे.