तुरीच्या भावात तेजी, ८०० रुपयांनी वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 11:41 AM2021-02-10T11:41:06+5:302021-02-10T11:41:17+5:30
Khamgaon APMC News गत दहा दिवसांत तुरीच्या दरात ८०० ते ९०० रुपयांनी वाढ झाली आहे.
- विवेक चांदूरकर
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : मागील वर्षीच्या तुलनेत कमी उत्पादन झाल्यामुळे यावर्षी तुरीचे भाव तेजीत आहेत. गत पंधरा दिवसांत तुरीच्या भावात ८०० ते ९०० रुपयांनी वाढ झाली आहे. गत दहा दिवसांपूर्वी तुरीचे दर ६१०० ते ६२५० रुपये प्रतिक्विंटल होते. आता त्यामध्ये वाढ होऊन ७१०० ते ७२०० रुपये प्रतिक्विंटल भाव झाले आहेत. गत दहा दिवसांत तुरीच्या दरात ८०० ते ९०० रुपयांनी वाढ झाली आहे.
गतवर्षी जून महिन्यात शेतकऱ्यांनी खरीप हंगामात तुरीची पेरणी केल्यानंतर चांगला पाऊस झाला. त्यामुळे तुरीचे पीक बहरले होते. मात्र, त्यानंतर परतीचा जोरदार पाऊस झाला. तसेच परतीचा पाऊस संततधार झाला. या पावसामुळे तूर पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आता तुरीचे पीक बाजार येण्याला सुरुवात झाली आहे. खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक वाढली असून, ८ फेब्रुवारी रोजी ५०२३ क्विंटल तुरीची आवक झाली. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला ६२५० रुपये भाव मिळाला होता. सध्या जिल्ह्यात तुरीची सोंगणी सुरू असून, बाजार समितीत आवक वाढत आहे. शासनाने तुरीला ६ हजार रुपये हमीभाव जाहीर केला आहे. परदेशातून मागणी वाढल्यामुळे कापूस महागला असून, त्यामुळे सरकी ढेपीच्या किमतीदेखील वाढल्या आहेत. यावर्षी पावसामुळे तुरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे मागील वर्षीपेक्षा चालू वर्षात तुरीचे उत्पादन कमी झाले. त्यामुळे तुरीच्या दरात एकतर्फी तेजी आली आहे.