तोरणदारी व मरणदारी हवी खबरदारी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:30 AM2021-04-05T04:30:49+5:302021-04-05T04:30:49+5:30
चिखली : कडक लॉकडाऊनचा तडाखा सोसल्यानंतरही थोडी शिथिलता मिळताच धूमधडाक्यात पार पडलेले लग्नसमारंभ व इतर सोहळ्यांनी जमविलेल्या गर्दीतून कोरोनाचा ...
चिखली : कडक लॉकडाऊनचा तडाखा सोसल्यानंतरही थोडी शिथिलता मिळताच धूमधडाक्यात पार पडलेले लग्नसमारंभ व इतर सोहळ्यांनी जमविलेल्या गर्दीतून कोरोनाचा पुन्हा विस्फोट झाला आहे. आजही नागरिकांकडून कोरोना नियमांना पायदळी तुडविले जात आहे. याचे ताजे उदाहरण सैलानी बाबांच्या संदलदरम्यान पाहावयास मिळाले. तथापि, इतर सर्व समारंभ आणि अंत्यविधीच्या कार्यक्रमावर बंधने असूनही, अनेकांना याचे गांभीर्य दिसत नाही, ही वस्तुस्थिती आहे. नागरिकांनी यापुढे तरी किमान तोरणदारी व मरणदारी याबाबत काळजी घेणे गरजेचे झाले आहे. सार्वजनिक कार्यक्रमाला जमणाऱ्या गर्दीला 'मास्क'चा विसर पडल्याचे दिसून येते.
कोरोनाची दुसरी लाट फार भयंकर रूप घेऊन आली आहे. दिवसागणिक बाधितांचा आकडा प्रचंड प्रमाणात वाढत आहे. कोरोनाबाधितांचा मृत्युदर वाढला आहे. हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध नाहीत. रक्ताचा तुटवडा आहे. लसीकरणाबाबतही अनास्था आहे. अशा स्थितीत कोरोनाचा अटकाव होणार तरी कसा? प्रशासनात कोरोनायोद्धे म्हणून कार्यरत सर्वच जण जीवावर उदार होऊन काम करत असताना आणि जिल्हा प्रशासनाने निर्बंध लावलेले असताना नागरिकांच्या बेजबाबदारपणाचे पावलोपावली दर्शन घडत आहे. प्रामुख्याने लग्नसमारंभ व अंत्यविधीच्या कार्यक्रमात होणारी गर्दी अचंबित करणारी आहे. प्रशासनाने बंधने घातलेली असतानाही अंत्यविधीसाठी अनेक ठिकाणी हजारो नागरिकांची गर्दी जमते. एकमेकांच्या सुख-दु:खांत सहभागी होताना किमान तोंडाला मास्क व हाताला सॅनिटायझर तरी हवे, इतका साधा नियमदेखील पाळला जात नाही, ही बाब अत्यंत खेदाची आहे. 'बापरे, केवढी ही गर्दी, पोलिसांना हे दिसत नाही का?', असे म्हणून केवळ पोलीस अथवा इतर प्रशासनावर खापर फोडणेही उचित ठरणार नाही.
सामूहिक प्रयत्नांची गरज!
कोरोनाच्या पहिल्या लाटेत प्रत्येकाने उत्स्फूर्त योगदान दिले. मात्र, आता तसे होताना दिसत नाही. केवळ प्रशासनावर जबाबदारी थोपविण्यात आली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून तरून जाण्यासाठी प्रत्येकाने पहिल्याप्रमाणेच योगदान देणे गरजेचे आहे. अगदी ग्रा.पं. सदस्यांपासून सरपंच, पं.स. सदस्य, जि.प. सदस्य, शहरी भागात नगरसेवक आणि आमदार, खासदार या लोकप्रतिनिधींसह सामाजिक कार्यकर्ते, संस्था आदी सर्व क्षेत्रांतील नागरिकांनी या लढ्यात उतरायला हवे. वाॅर्ड, गाव, पं.स. गण, जि.प. सर्कल, तालुका, मतदारसंघ याप्रमाणे आपापल्या कार्यक्षेत्रात किमान प्रशासनाने सद्य:स्थितीत लावलेल्या निर्बंधांची काटेकोरपणे अंमलबजावणी होते किंवा नाही, यावर लक्ष देण्यासह उपाययोजनांची काय स्थिती आहे अथवा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, या अनुषंगाने नेमके काय करता येईल, यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याची गरज आहे.