बुलडाणा जिल्ह्यात मुसळधार पाऊस; खडकपूर्णाचे १९ दरवाजे दीड फुटाने उघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2021 11:08 AM2021-09-28T11:08:52+5:302021-09-28T11:09:51+5:30
Heavy rain in Buldhana District : खामगाव-चिखली, बुलडाणा-चिखली, मोताळा-नांदुरा हे मार्ग बंद पडले आहेत.
बुलडाणा: जिल्ह्यात गेल्या १२ तापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून खामगाव-चिखली, बुलडाणा-चिखली, मोताळा-नांदुरा हे मार्ग बंद पडले आहेत. दुसरीकडे बुलडाणा तालुक्यातील नांद्रा कोळी येथील दोन जण पुराच्या पाण्यात बेपत्ता झालले आहे. यासोबतच खडकपूर्णा प्रकल्पाचे सर्वच्या सर्व १९ दरवाजे दीड फुटापर्यंत (५० सेमी) उघडण्यात आले असून त्यातून ३७ हजार ९४० क्युसेक (१०७३ क्युमेक्स) आणि पेनटाकली प्रकल्पाचेही तीन दरवाजे उघडण्यात आले आहे. त्यातून ४४.६५ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे.जिल्ह्यात सोमवारी रात्री ९ वाजल्यापासून संततधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे बुलडाणा, चिखली, मोताळा तालुक्यातील नदी-नाले एक झाले आहे. पैनगंगा नदीनेही पात्र सोडल्याने नदीकाठची शेती खरडून गेल्याची भीती व्यक्त होत आहे.
त्यातच बुलडाणा तालुक्यातील नांद्रा कोळी येथील नाल्याला आलेल्या पुरात २७ सप्टेंबर रोजी दोन जण वाहून गेले आहेत. जवळपास १०० मीटर अंतरावर या दोघांची दुचाकी आढळून आली आहे. बचाव पथक सध्या त्यांचा शोध घेत असून मंगळवारी सकाळी ११ वाजता बेपत्ता झालेल्या या दोघांपैकी एक जण सुखरूप सापडल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. अन्य एकाचा शोध घेण्यात येत आहे.
जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता पाहता २७ सप्टेंबर रोजीच जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला होता. २६ सप्टेंबर रोजीही याबाबत प्रशासकीय पातळीवर सुचनाही देण्यात आल्या होत्या.
अद्यापही बुलडाणा जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असून निर्माण झालेल्या पुर परिस्थितीमुळे जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यातील नळगंगा हा मोठा प्रकल्पही ७५ टक्क्यांपेक्षा अधिक भरला आहे. पेनटाकळी व खडकपूर्णा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग होत आहे.
दुसरकीडे मध्यरात्री निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीमुळे चिखली-बुलडाणा, नांदुरा-मोताळा आणि खामगाव-चिखली हा मार्ग पेठनजीक पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे बंद झाला आहे. जिल्ह्यात पैनगंगा, विश्वगंगा नद्यांसह त्यांच्या काही उपनद्यांनाही पुर आला आहे. अद्यापही जिल्ह्यात संततधार पाऊस सुरूच आहे.