मोताळा तालुक्यात तूर खरेदी बंदच!
By admin | Published: May 14, 2017 04:05 AM2017-05-14T04:05:21+5:302017-05-14T04:05:21+5:30
शासनाची घोषणा फोल; आ. सपकाळ यांनी घेतली जिल्हाधिकार्यांची भेट.
धामणगाव बढे : हमी भावाने तूर खरेदीसाठी शासनाने मुदतवाढ दिली असली, तरी मोताळा तालुक्यात तूर खरेदीसाठी संबंधितांना परवानगी न मिळाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
तूर खरेदीसाठी मुदतवाढ मिळाल्यानंतर शेतकर्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. तातडीने तूर खरेदी केंद्र सुरू होतील, अशी शेतकर्यांना अपेक्षा होती. मात्र मोताळा तालुक्यातील पिंपळगाव देवी केंद्रावरील २२ एप्रिल रोजी पंचनामा झालेला शेतमाल मागील दोन दिवसांपासून मोजणे सुरू आहे, तर नवीन माल खरेदी करण्याची परवानगी नसल्यामुळे शेतकरी प्रतीक्षेत आहेत.
जिल्ह्यात खरेदी- विक्री संघाच्या माध्यमातून नाफेड तूर खरेदी करीत आहे. मात्र, मोताळा तालुक्यात खरेदी-विक्री संघ अस्तित्वात नाही. त्यामुळे अडचण निर्माण होत आहे. मोताळा कृषी उत्पन्न बाजार समितीने जिल्हा खरेदी-विक्री संघांतर्गत तूर खरेदी करण्याची तयारी दर्शविली आहे. तसा प्रस्ताव त्यांनी जिल्हाधिकारी बुलडाणा व संबंधितांना पाठविला आहे. आ.हर्षवर्धन सपकाळ यांनी मोताळा तालुक्यातील तूर खरेदी केंद्र तातडीने सुरू करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी बुलडाणा यांची १२ मे रोजी भेट घेतली, तर जिल्हाधिकारी पुलकुंडवार यांनी मोताळा तालुक्यासाठीचा तूर खरेदीचा प्रस्ताव दिल्ली येथे पाठविला असल्याचे सांगितले. मोताळा तालुक्यात शेतकर्यांकडे शेकडो क्विंटल तूर घरात पडून आहे. बाजारात पडलेल्या तुरीच्या भावामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. तूर खरेदीस मान्यता मिळाल्यास लाल माती येथील केंद्र सुरू होण्याची शक्यता नाही. तेथील केंद्र खासगी जागेत सुरू होते व संबंधित व्यक्तीने जागा देण्यास असर्मथता दर्शविली. त्यामुळे मोताळा येथे खरेदी केंद्र सुरू करावे लागेल.
आधी पंचनामा करुन पडलेली तूर मोजून घेणेबाबत जिल्हाधिकार्यांशी चर्चा केली. त्या अनुषंगाने ती तूर खरेदीस प्रारंभ झाला. तसेच मुदतवाढीनंतर सुद्धा फक्त घोषणा करुन तूर खरेदीची शासनाची मानसिकता नाही. शेतकर्यांच्या घरात पडलेली तूर शासनास खरेदी करण्यास बाध्य करू. भा.रा.काँग्रेस पक्ष शेतकर्यांना वार्यावर सोडणार नाही.
- आ. हर्षवर्धन सपकाळ, बुलडाणा