कुष्ठरोग जनजागृतीसाठी ‘स्पर्श’ मोहीम
By admin | Published: January 22, 2017 02:58 AM2017-01-22T02:58:43+5:302017-01-22T02:58:43+5:30
बुलडाणा जिल्ह्यात ३0 जानेवारी ते १३ फेब्रुवारी हा कुष्ठरोग निवारण पंधरवडा साजरा होणार.
बुलडाणा, दि. २१- दरवर्षी ३0 जानेवारी हा कुष्ठरोग निवारण दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त ३0 जानेवारी ते १३ फेब्रुवारी हा कुष्ठरोग निवारण पंधरवडा साजरा करण्यात येतो. मात्र, या वर्षात कुष्ठरोगाचे बाहेर न आलेले रुग्ण शोधण्यासाठी आणि रोगाविषयी जनजागृती करण्यासाठी स्पर्श मोहीम राबविण्यात येणार आहे.
याविषयी जिल्हास्तरीय कुष्ठरोग समन्वय समितीची सभा जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी आरोग्य सेवा सहायक संचालक डॉ.के.एस. वासनिक, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, ३0 जानेवारी रोजी विशेष ग्रामसभेच्या आयोजनात या रोगाविषयी माहिती द्यावी. तसेच रुग्णांना उपचाराविषयी मार्गदर्शन करावे.
तसेच जिल्हाधिकार्यांच्या संदेशाचे वाचन करून सरपंचांना मनोगत व्यक्त करायला लावायचे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी असल्यामुळे सर्वांना कुष्ठरोग निवारणाची शपथ द्यावी.
सर्व शाळा, आश्रम शाळा, कार्यालयातसुद्धा शपथ देण्याच्या सूचना जिल्हाधिकार्यांनी यावेळी दिल्या. याप्रसंगी संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
स्पर्श मोहिमेदरम्यान शासनाच्यावतीने नेमणूक करण्यात आलेले अधिकारी कुष्ठरोग्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. कुष्ठरोग झाल्यानंतर अनेकजण याबाबत कुठेही वाच्यता करीत नाहीत. त्यामुळे या रोगांचा संसर्ग वाढतच जातो. या रोग्यांचा शोध आता स्पर्श मोहिमेदरम्यान घेण्यात येणार आहे.