क्षयरोग निर्मुलनाच्या दिशेने वाटचाल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 11:50 AM2021-03-24T11:50:08+5:302021-03-24T11:50:34+5:30
Towards Tuberculosis Eradication क्षयरोग उच्चाटनासाठी जिल्ह्यात १३ पथकाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : क्षयरोगाविषयी जनजागृती करण्यासाठी तसेच क्षयरोगाचे दूरीकरण करण्यासाठी प्रयत्न वाढविण्याकरिता २४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो. वेळ निघून जात आहे, क्षयरोग उच्चाटन उद्दिष्ट गाठण्याची असे यंदाच्या क्षयरोग दिनाचे घोषवाक्य आहे. त्यानुसार सध्या क्षयरोग उच्चाटनासाठी जिल्ह्यात १३ पथकाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत.
संसर्गजन्य रोगामध्ये क्षयरोगाचा समावेश होतो. क्षयरोग उच्चाटनासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यामध्ये एकूण १३ तालुक्याला १ असे १३ पथक आहेत व जिल्ह्यामध्ये एकूण २६ डी.एम.सी. मान्यताप्राप्त सूक्ष्मतादर्शक केंद्रे आहेत. प्रत्येक क्षयरोग पथकाला एक वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक कार्यरत आहेत. व ५ ते ६ डी.एम.सी. साठी एक वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक, सहा शहरी भागासाठी सहा टह.बी.एच.व्ही. कार्यरत आहेत. बुलडाणा येथे एक जिल्हा क्षयरोग केंद्र असून तेथे जिल्हा क्षयरोग अधिकारी व वैद्यकीय अधिकारी, डी.पी.सी., डी.पी.एस, पी.पी. एम., डी.ई.ओ. लेखापाल, इत्यादी स्टाफ आहे. बुलडाणा जिल्ह्यामध्ये प्रत्येक महिन्याला अंदाजे शासकीय रुग्णालयातून १३० व खासगी डॉक्टरांकडून १२० असे एकूण अंदाजे २५० नवीन टीबीचे रुग्ण शोधून उपचारावर ठेवले जातात.
क्षयरुग्ण शोधून शासकीय यंत्रणेला कळवल्यास प्रत्येक क्षयरुग्णामागे १००० रुपये डॉक्टरांना मिळतात. ५०० रुपये प्रति महिना सर्व क्षयरुग्णांसाठी पोषक आहारासाठी दिले जातात. जागतिक क्षयरोग दिनाच्या निमीत्ताने वेगवेगळे जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. २०२५ पर्यंत क्षयरोग नष्ट करण्यांचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्या अनुषंगाने प्रयत्न सुरू आहेत.
- डॉ. मिलिंद जाधव,
जिल्हा क्षयरोग अधिकारी,
बुलडाणा.