भुईमुगाच्या पिकावर फिरविला ट्रॅक्टर!
By admin | Published: June 16, 2017 08:09 PM2017-06-16T20:09:07+5:302017-06-16T20:09:07+5:30
उत्पादनाला फटका: लागवड खर्चही निघाला नाही
संतोष आगलावे
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरखेड : भुईमुग तयार करण्याचा चार महिन्याचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरही भुईमुगाला शेंगा न लागल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी अखेर १५ जून रोजी उभ्या भुईमुगाच्या पिकावर ट्रॅक्टर फिरविला. ऐन खरीप पेरणीच्या तोंडावरच यामुळे शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे.
संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथील अल्पभुधारक शेतकरी गणेश जयदेव इंगळे यांची बोरखेड गावालगत गट नं.२ मध्ये पाच एकर बागायती शेती आहे. यामधील अडीच एकरामध्ये १० जानेवारी रोजी भुईमूगाची लागवड केली. या पिकाची मशागतही केली. दरम्यान, शेतातील भुईमुगाच्या ८० टक्के झाडांना शेंगा निरंक असल्याने भुईमुंग तयार करण्यासाठीही बटाईने सुध्दा मजूर येत नव्हता. भुईमुगाचे पिक उभे करण्याकरिता लागलेला खर्च उसनवारी असल्याने ही परतफेड कशी करावी या विंवचनेतच भुईमुग उत्पादक शेतकरी अडकला आहे.
परिसरातील इतरही शेतकरी संकटात!
बोरखेड परिसरातील इतरही शेतकऱ्यांनी यापूर्वीच आपल्या शेतातील भुईमंूग काढून टाकला आहे. खर्चापेक्षा उत्पादन कमी झाल्याने, शेतकऱ्यांनी उभे पिक ट्रॅक्टरने नष्ट केले आहे.
भुईमुंगाला शेंगा न धरल्या नाहीत. गुरांच्या चाऱ्यासाठी मजुरांना बटाईने पिक तयार करण्यासाठी आणले. मात्र, शेंगाच नसल्याने मजूरही परत गेल्याने अखेरीस पिकावर ट्रॅक्टर फिरविण्याचा निर्णय घेतला.
- गणेश इंगळे, शेतकरी