सिमेंटचे खांब घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरची ट्राली उलटली, दाेन ठार
By संदीप वानखेडे | Published: September 22, 2024 06:48 PM2024-09-22T18:48:41+5:302024-09-22T18:48:54+5:30
पुन्हई फाट्याजवळील घटना : तीन जण गंभीर
माेताळा : सिमेंटचे खांब घेऊन जाणारी ट्रॅक्टरची ट्राली उलटल्याने दाेन जण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले. ही घटना २२ सप्टेंबर राेजी दुपारी बाेरखेडी ते वडगाव रस्त्यावर पुन्हई फाट्याजवळ घडली. मंगेश ज्ञानदेव सातव (वय ३२) व रामदास पुंजाजी बेलोकार (वय ४०) रा.वाडी ता.नांदुरा असे मृतकांची नावे आहेत. गंभीर जखमींवर बुलढाणा शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
माेताळा येथून सिमेंटचे खांब घेऊन ट्रॅक्टर क्र.एम.एच. ४० ए-३४८७ ने २२ सप्टेंबर राेजी बोराखेडी वडगाव नेण्यात येत हाेते. खांब उतरविण्यासाठी रामदास बेलोकार, संतोष बेलोकार (वय ३५), हरीश बेलोकार (वय २३), मंगेश सातव, शुभम खंडारे (वय २१) आदी ट्रॉलीमध्ये बसलेले हाेते. दरम्यान, ट्रॅक्टर पुन्हई फाट्याजवळ आल्यानंतर ट्राॅली उलटली. त्यामुळे ट्राॅलीमधील खांब रस्त्यावर पडले व त्याखाली पाचही मजूर दबले. यावेळी मोठा आरडाओरड झाल्याने स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी पोहोचून जखमींना बाहेर काढले.
या घटनेची माहिती मिळताच, बोराखेडी पाेलिस घटनास्थळी दाखल झाले, तसेच जखमींना १०८ रुग्णवाहिकेने ग्रामीण रुग्णालय, मोताळा येथे दाखल करण्यात आले. तेथे प्रथमाेपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालय, बुलढाणा येथे नेण्यात आले. उपचारादरम्यान वाडी ता.नांदुरा येथील मंगेश ज्ञानदेव सातव व रामदास पुंजाजी बेलोकार यांचा मृत्यू झाला. इतर जखमीवर बुलढाण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.