दांडिया खेळताना व्यापाऱ्याचा झाला मृत्यू, मेहकर तालुक्यातील घटना
By निलेश जोशी | Published: October 3, 2022 07:15 PM2022-10-03T19:15:42+5:302022-10-03T19:16:01+5:30
हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज
जानेफळ (जि. बुलढाणा): मेहकर तालुक्यातील जानेफळ येथे दांडिया खेळताना ४७ वर्षीय व्यापाऱ्याचा अचानक खाली कोसळून मृत्यू झाला. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा कयास व्यक्त होत आहे. ही घटना २ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली.
जानेफळ येथील पडधरीया कुटुंब गेल्या काही वर्षांपासून आपल्या घरासमोर देवी नवरात्रात देवी बसवतात. यंदाही त्यांनी देवी बसवली होती. २ ऑक्टोबर रोजी रात्री देवीसमोर दांडिया खेळत असलेले व्यापारी विशाल पडधरीया हे अचानक जमीनीवर कोसळले. भोवळ आल्याचे समजून त्यांना स्थानिक नागरिकांनी त्वरित खासगी रुग्णालयात डॉ. केशव अवचार यांच्याकडे नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा कयास व्यक्त केला जात आहे. विशाल पडधरिया यांच्या मृत्यूमुळे जानेफळ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच जानेफळमधील व्यापाऱ्यांनी सोमवारी त्यांची दुकाने बंद ठेवली होती.