‘जनता कर्फ्यू’ला व्यापारी, नागरिकांचा प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:36 AM2021-05-07T04:36:31+5:302021-05-07T04:36:31+5:30
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन नगरपालिकेने ५ मे पासून सात दिवसांच्या ‘जनता कर्फ्यू’ची घोषणा केली होती. सोबतच केवळ मेडिकल ...
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन नगरपालिकेने ५ मे पासून सात दिवसांच्या ‘जनता कर्फ्यू’ची घोषणा केली होती. सोबतच केवळ मेडिकल इमर्जन्सीसाठीच बाहेर पडता येईल, असे स्पष्ट करण्यात असल्याने नागरिकांनीही घरात बसणे पसंत केले आहे. आवश्यक सेवेत केवळ रुग्णालये, औषधी दुकाने, पेट्रोल पंप, गॅस पुरवठा करणारी कार्यालये आणि ठरलेल्या वेळेत डेअरी सुरू राहणार असल्याने अनावश्यक गर्दी ओसरली आहे. असे असले तरीही, काही उत्साही लोक शासकीय काम पुढे करून बाहेर पडत आहेत, तर ग्रामीण भागातील लोकांनी शहरात येऊ नये यासाठी सूचना देण्यात आल्या होत्या. त्यातही नियंत्रण आले असून, ग्रामीण भागातील लोकांनी शहरात येणे टाळले आहे. सकाळी काही वेळ वर्दळ दिसते; मात्र काही तासातच शहरात शांतता दिसून येत आहे.
लसीकरण केंद्रावर गर्दी
शहरात इतर ठिकाणी कुठेही गर्दी दिसते, परंतु ग्रामीण रुग्णालयात बुधवारी लसीकरण सुरू झाल्याने या परिसरात मोठी गर्दी होत आहे. पोलीस आणि आरोग्य विभागाने याकडे नियोजनबद्ध पद्धतीने पाहिल्यास येथेही लसीकरण सुस्थितीत होऊ शकेल.
शूटिंग कॅमेरा घेऊन फिरतात कर्मचारी
‘जनता कर्फ्यू’ व त्यापूर्वी शहरात विनामस्क फिरणारे, वेळेत आपली प्रतिष्ठाने बंद न करता पालिका कर्मचाऱ्यांवर अरेरावी करणाऱ्यांना चाप बसावा, यासाठी गेल्या काही दिवसांपासून पालिका कर्मचारी व्हिडिओ शूटिंग कॅमेरा घेऊन फिरत आहेत. पालिकेच्या या युक्तीमुळे अरेरावी करणाऱ्यांची गोची झाली आहे.