रस्त्याच्या काँक्रिटीकरणास व्यापार्यांचा विरोध!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 12:00 AM2017-11-20T00:00:47+5:302017-11-20T00:05:17+5:30
खामगाव : शहरातील मुख्य रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या प्रस्तावित कामास विरोध दर्शवित काँक्रीटीकरणाऐवजी डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी काही व्यापार्यांनी केली आहे. याबाबत कृषीमंत्री तथा पालकमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांना निवेदन देण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : शहरातील मुख्य रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या प्रस्तावित कामास विरोध दर्शवित काँक्रीटीकरणाऐवजी डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी काही व्यापार्यांनी केली आहे. याबाबत कृषीमंत्री तथा पालकमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांना निवेदन देण्यात आले आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, भारत कटपीस ते फरशी पर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम नगर परिषदेने हाती घेतले. या कामावर साडे सहा कोटी रूपये खर्च करण्यात येणार असल्याच्या बातम्या वृत्तपत्रात वाचल्या आहेत. एक वर्षापुर्वी या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम होणार होते. याकरीता ७0 लाख रूपयाचे टेंडर सुध्दा निघाले होते. परंतु कारण नसताना ते टेंडर रद्द करण्यात आले. व आता याच रस्त्यावर काँक्रीटीकरणाच्या नावाखाली कोट्यावधी रूपये खर्च करण्यात येणार आहेत. सदर रस्ता सध्या डांबरी असून ७५ टक्केच्यावर सुस्थितीत आहे. या रस्त्यावर जड वाहनांची रहदारी नसल्यामुळे सिमेंट रस्ता करण्याची गरज नाही. तसेच रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामाच्या निमित्ताने आमच्या दुकानासमोरील अनेक वर्षापासून बांधण्यात आलेल्या पायर्या, ओटे व टाईल्स तोडणार असल्याचे समजते. त्यामुळे दुकानात ग्राहकास येण्यास अडचण निर्माण होणार असून त्याचा परिणाम आमच्या व्यवसायावर होणार आहे. येणार्या काळात लग्न सराई असल्यामुळे ग्राहकांना सुध्दा त्याचा त्रास होईल.
सदर निवेदनावर दर्शन वर्मा, जितेंद्र वर्मा, प्रेमचंद आरडेजा यांच्यासह अनेक व्यापार्यांच्या सह्या आहेत.
विकासकामे सर्वांच्या हिताचीच - शिनगारे
खामगाव शहरात नगर पालिकेमार्फत मोठय़ा प्रमाणात विकास कामे सुरु आहेत. या अंतर्गतच शहरातील सर्वात महत्वाचा मुख्य रस्ता जो सतत वर्दळीचा असतो, तो कायमचा चांगला होण्याच्या दृष्टीने नगर परिषदेने तो काँक्रीटचा करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु राजकीय स्वार्थापोटी या रस्त्याचे रुंदीकरण होऊ नये यासाठी काही लोक प्रयत्नरत आहेत असा आरोप भाजपा शहराध्यक्ष संजय शिनगारे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केला. शिनगारे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात नमूद केले की, या रस्त्यामुळे व्यापार्यांचे कसे आर्थिक नुकसान होईल असे पटविण्याचे काम काही तथाकथीत हितचिंतक करीत आहेत. मागिल १५ वर्षात व्यापार्यांच्या प्रतिष्ठानासमोर तुंबलेल्या नाल्या ज्यांच्याकडून साफ झाल्या नाहीत, ज्यामुळे व्यापार्यांना घाणीचा त्रास व वास सहन करावा लागत होता ते आज व्यापार्यांना त्यांचे हित सांगताना दिसत आहेत. नगरपालिकेने मेनरोड वरील व्यापार्यांचा त्रास कायमचा दूर व्हावा या हेतूने ५ कोटी खर्च करुन काँक्रीटचा रस्ता नाल्यांसह बनविण्याचे ठरविले. त्यामुळे व्यापार्यांसह नागरिकांना त्रास होणार नाही.याबाबत जे निवेदन देण्यात आले त्यावर काही व्यापार्यांनी सह्या नाही केल्या तरी त्यांची नावे यात टाकण्यात आली आहे. काही व्यापार्यांना रस्त्याचे काम तातडीने सुरु होण्यासाठी निवेदन द्यायचे आहे असे सांगून सह्या घेतल्या. शहरात होत असलेल्या विकासकामांमुळे काही तथाकथित विकास पुरुषांचे धाबे दणाणले. त्यामुळे उरले सुरले अस्तित्व राखण्यासाठी खोटे नाटे धंदे करुन विकास कामे रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.आरोपही शिनगारे यांनी केला.