खामगावातील ऐतिहासिक शांती महोत्सव खंडीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 10:21 AM2020-10-16T10:21:39+5:302020-10-16T10:21:49+5:30
Khamgaon शांती महोत्सव रद्द करण्यात आल्याची माहिती मोठी देवी शांती महोत्सव समितीचे अध्यक्ष उत्तमराव उमरकर यांनी दिली.
- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: तब्बल एका शतकापेक्षा अधिक वर्षांची परंपरा असलेला शांती (जगदंबा, मोठी देवी) महोत्सव कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने स्थगीत करण्यात आला आहे. त्यामुळे खामगावातील शांती, भक्ती आणि शक्तीच्या उत्सवावर विरजण पडले आहे. तथापि, आता शासनाच्या परवानगीकडे खामगावातील भाविकांच्या नजरा लागून आहे.
संपूर्ण देशात केवळ खामगाव आणि परिसरात शांती महोत्सव साजरा होतो. कोजागिरी पोर्णिमेपासून पुढील ११ दिवस हा महोत्सव भक्तीभावाने पार पडतो. त्यामुळे या महोत्सवाची परिसरातील भाविकांना प्रतीक्षा असते. देशाच्या कानाकोपºयातील भाविक येथे शांती महोत्सवात दर्शनासाठी आपल्या परिवारासह येतात. मात्र, यंदा कोरोना विषाणू संसर्गामुळे शांती महोत्सव रद्द करण्यात आल्याची माहिती मोठी देवी शांती महोत्सव समितीचे अध्यक्ष उत्तमराव उमरकर यांनी दिली.
असा आहे शांती महोत्सवाचा इतिहास
विजयादशमीला असुरांचा संहार करून देवी परत आल्यानंतर, देवीचा चेहरा क्रोधीत असल्याने लाल झालेला असतो. त्यामुळे म्हणून या देवीचा चेहरा लाल रंगाचा करण्यात येतो. तसेच देवीला शांत करण्याकरीता पूजा, अर्चना, आराधना केली जाते. त्या उत्सवाला शांती उत्सव असे म्हटले जाते. जंगदबा उत्सव, मोठी देवी उत्सव केवळ खामगावातच साजरा होत असल्याने, या उत्सवाला वेगळे महत्व असून एक वेगळीच परंपरा हा उत्सव राखून आहे. श्री जगदंबा सार्वजनिक उत्सव मंडळाच्यावतीने शहरातील जलालपुरा भागात अनेक वर्षापासून तर खामगाव शहरात सन १९०८ पासून साजरा होणारा जगदंबा मातेचा उत्सव आता खामगाव शहर आणि परिसरातील खेड्यापाड्यात ठिकठिकाणी उत्साहाने साजरा करण्याची प्रथा सुरू झाली आहे.
मोठी देवीचा बोधन ते खामगाव प्रवास
आंध्रप्रदेशात निजामाबाद जिल्ह्यात बोधन गाव आहे. महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्याच्या सिमेनंतर आंध्र प्रदेशच्या सिमेस प्रारंभ होतो व सिमेपासून काही अंतरावर हरीद्रा नदी वाहते. या नदीच्या काठी मातेचे पूर्वी स्थान होते. कालांतराने ते बोधन गावच्या मध्यभागी मातेचे जागृत स्थान स्थायीक झाले. तेथूनच देवी खामगावात आली. कै.कैरन्ना आनंदे हे लोहगाव येथील रहिवासी होते. बिड्याच्या व्यवसायाकरीता लागणाºया पानाच्या व्यवहाराकरीता बोधन येथे त्यांचे येण-जाणे राहायचे. त्यामुळे ते बोधनच्या मातेचे भक्त झाले. लोहगाव येथे मातेच्या मुर्तीची स्थापना करून उत्सव साजरा करत. कालांतराने त्यांनी खामगाव शहरात येऊन व्यवसाय सुरू केला. त्यानंतर खामगावात त्यांनी आपल्या स्वत:च्या बिडी कारखान्यातील सर्व जातीधर्माच्या कामगारांच्या सहाय्याने हा उत्सव सुरू केला. हीच प्रथा पुढे सुरू आहे.
शासनाच्या परवानगीची प्रतीक्षा!
नवरात्रोत्सवाला काही विशिष्ट अटींवर परवानगी नाकारण्यात आल्यावर खामगाव येथील मोठी देवी शांती महोत्सव मंडळानेही मोठी देवीचा महोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात मंडळाचे अध्यक्ष उत्तमराव उमरकर यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे शांती महोत्सव तयार रद्द झाल्याचे स्पष्ट केले. मात्र, या महोत्सवाला कोजागिरी पोर्णिमा म्हणजेच ३० तारखेपर्यंतचा अवधी आहे. त्यामुळे शासनाच्या परवानगीची भाविकांना प्रतीक्षा असून ३० तारखेपर्यंत महोत्सवाला परवानगी मिळेल, अशी अनेकांना आशा आहे.