बुलडाण्यात ६४ वर्षांपासून जोपासली जात आहे सर्वधर्मसमभाव प्रार्थनेची परंपरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 05:53 PM2018-08-04T17:53:35+5:302018-08-04T17:55:35+5:30
महामानवांना अभिवादन करण्यासाठी येथील भारत परिवारातर्फे १९५४ पासून दरवर्षी १ आॅगस्टला सर्वधर्मसमभावाची राष्ट्रीय प्रार्थना घेण्यात येते.
बुलडाणा : ज्या महामानवांनीे मानवी जीवन जगण्यासाठी सुकर व समृद्ध केले. असीम त्याग आणि बलिदान समाजामध्ये शाश्वत मूल्यांची पेरणी केली. त्या महामानवांना अभिवादन करण्यासाठी येथील भारत परिवारातर्फे १९५४ पासून दरवर्षी १ आॅगस्टला सर्वधर्मसमभावाची राष्ट्रीय प्रार्थना घेण्यात येते. मागील ६४ वर्षापासून नियमित राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामध्ये दरवर्षी विविध मान्यवर सहभाग घेत असून जागतिक शांततेसाठी प्रार्थना करतात. बुलडाणा शहरासाठी एक संस्कार शाळा म्हणून भारत विद्यालय हे ओळखले जाते. या भारत विद्यालयातील अनेक चाकोरीबाहेरील उपक्रमांपैकी एक उपक्रम म्हणून सर्व राष्ट्रीय महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व दिव्यांची आणि विविध फुलांची आरास करून जागतिक शांततेसाठी या प्रार्थनेला सुरुवात होते. आॅगस्ट महिना हा क्रांतीचा महिना. याच महिन्यामध्ये चले जावची चळवळ झाली होती व अनेक महात्मे याच महिन्यात जन्माला आले होते. या महात्म्यांना व क्रांतिकारकांच्या बलिदानाला वंदन करण्यासाठी या दिवशी भल्या पहाटे ही प्रार्थना घेतल्या जाते. प्रार्थना ही मन:शांतीसाठी असते, एकाग्रतेसाठी असते व ती आदरभाव व्यक्त करण्यासाठी असते. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अतिशय चांगला प्रकार म्हणजे प्रार्थना. या प्रार्थनेच्या माध्यमातून देशभक्तांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात येते. या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या या प्रार्थनेमध्ये ‘धागा धागा अखंड विणूया’ हे गीत संस्थेचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते हर्षवर्धन आगाशे यांनी घेतल्यानंतर ‘हे मालिक तेरे बंदे हम’ ही समूह स्वरात प्रार्थना घेण्यात आली. या प्रार्थनेला प्रमुख अतिथी म्हणून यावर्षी येथील वेद विद्यालयाचे सतीष करंडे गुरुजी यांनी विद्यार्थ्यांना विद्यार्थी जीवनामध्ये विज्ञाना सोबतच आध्यात्मिक तत्त्वज्ञानाचा अभ्यास करावा, असे विचार मांडले. विद्यालयाचे मुख्याध्यापक राम पालवे यांच्या हस्ते यावेळेस करंडे गुरुजींचा सत्कार करण्यात आला. यावेळी परिसरातील व भारत विद्यालयातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
अखंडीत परंपरेची जोपासना
भारत विद्यालयात भारत परिवारातर्फे प्रार्थनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविधांगी संस्कार करणारी अशी ही शाळा गेल्या ६४ वषार्पासून सर्वधर्मसमभावाच्या प्रार्थनेची आपली एक वेगळी परंपरा जोपासत आहे . या प्रार्थनेला बुलडाणा शहरातील निवडक निमंत्रित व विद्यार्थी शिक्षक वृंद दरवर्षी मोठ्या संख्येने उपस्थित असतात. अशी परंपरा जोपासणारी परिसरातील भारत विद्यालय एकमेव शाळा असून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.