राहेरीच्या पुलावरून वाहतुकीस बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 12:00 PM2020-12-22T12:00:49+5:302020-12-22T12:03:50+5:30
Bridge on Purna River पूर्णा नदीवरील पुलाची भारवाहन क्षमता संपल्याने हा पूल अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदखेडराजा : तालुक्यातील राहेरी बु. येथील पूर्णा नदीवरील पुलाची भारवाहन क्षमता संपल्याने हा पूल अनिश्चित काळासाठी बंद करण्यात येत असल्याची माहिती भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने सिनियर इंजिनियर सुरेश कसबे यांनी दिली आहे.
राहेरी येथील हा पूल १९७१-७२ मध्ये बांधण्यात आला हाेता. दरम्यान, गेल्या काही वर्षांत या मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. जड वाहतुकीमुळे पूल कमकुवत होत गेला. २०१८ मध्ये बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी या पुलाचे स्ट्रक्चर ऑडिट करून पूल कमकुवत झाल्याचे निदर्शनास आणून दिले होते. याच दरम्यान, जालना, बुलडाणा जिल्हाधिकाऱ्यांनी एक नोटिफिकेशन जारी करून या मार्गावरील सर्वप्रकारची जड वाहतूक बंद केली होती. वाहतूक बंद करताना जालन्याकडून येणारी जड वाहतूक देऊळगाव राजा, चिखलीमार्गे मेहकर किंवा खामगावमार्गे अमरावती, नागपूरकडे वळविण्यात आली होती. परंतु पुलाची सक्षम अभियांत्याकडून डागडुजी करण्यात आल्यानंतर हा पूल पुन्हा वाहतुकीसाठी खुला झाला.अर्थात प्रशासनाच्या लेखी हा पूल वाहतुकीसाठी बंद होता, पण वाहतूक मात्र जोरात सुरू होती. हा राज्यमार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे ऑक्टाेबर २०१९ मध्ये हस्तांतरित झाल्यानंतर जुलै २०२०मध्ये या पुलावरील जड वाहतूक बंद करण्यासंदर्भात एक पत्र जालना, बुलडाणा व अकोला जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आले होते. परंतु सहा महिने होऊनही वाहतूक बंद करण्यात आली नव्हती.
पालकमंत्र्यांच्या सूचनेने यंत्रणा सज्ज
पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी रविवारी या पुलाची पाहणी केली असता पुलाची दुरवस्था त्यांच्या लक्षात आली. त्यांनी लगेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण इंजिनियर सुरेश कसबे यांना वाहतूक सक्तीने बंद करण्याच्या सूचना दिल्या. या पुलावरून वाहतूक अशीच सुरू राहिल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही ही बाब गंभीर असून, जड वाहतूक बंद करण्याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी यांनीही सूचित केले आहे. पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या सूचना येताच जालना व बुलडाणा जिल्हाधिकारी यांनी संयुक्तपणे वाहतूक बंद करण्याबाबत पोलीस यंत्रणेला सुचविले असल्याने तत्काळ प्रभावाने जड, अवजड वाहतुकीसाठी हा मार्ग बंद करण्यात आला आहे.