बुलडाणा-औरंगाबाद रस्त्यावर वाहतूक कोंडीचा प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 03:19 PM2020-09-20T15:19:59+5:302020-09-20T15:20:33+5:30
बुलडाणा ते औरंगाबाद या मुख्य मार्गावर वाहतूक कोंडीचाही प्रश्न आहे.
बुलडाणा: जिल्ह्यात शनिवारी जोरदार पाऊस झाला. यामध्ये रस्त्या काम सुरू असलेल्या ठिकाणी चिखल निर्माण झाल्याने वाहतूकीस अडचणी येत आहेत. बुलडाणाऔरंगाबाद रस्त्याचे अनेक दिवंसापासून काम सुरू आहे. थोडासा पाऊस आल्यानंतर या रस्त्यावर चिखल निर्माण होत असून, अपघाताच्या घटनाही वाढत आहेत. त्यामुळे बुलडाणा ते औरंगाबाद या मुख्य मार्गावर वाहतूक कोंडीचाही प्रश्न आहे.
बुलडाणा ते औरंगाबाद मार्गावर धाड असून, या रस्त्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. परंतू हे काम संथगतीने होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे पाऊस येताच या रस्त्यावर चिखल निर्माण होतो. परिणामी, वाहने रोडच्या बाजूला घसरून छोटे-मोठे अपघातही घडत आहे. या रस्त्यावर बºयाच ठिकाणी अर्धवट कामे झाली आहेत. ज्या ठिकाणी रस्त्याचे काम चांगले आहे, त्याठिकाणी वाहने भरधाव वेगात जातात. परंतू काही अंतरावर जाताच पुन्हा खोदलेला रस्ता लागतो. त्यामुळे भरधाव वेगात आलेल्या वाहनाचा अपघात होण्याचा धोका वाढलेला आहे. हा रस्ता घाट व वळण मार्गातून जात असल्याने त्याठिकाणीही अपघाताचा धोका अधिक आहे. बुलडाणा-धाड रोडने औरंगाबाद मार्ग जात असल्याने या रस्त्याने वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते. बुलडाणा ते धाडपर्यंतच्या या रस्त्याला अनेक खेडे जोडलेली आहेत. काही ठिकाणी पुलाचे कामही सुरू आहे. त्यासाठी ज्या-ज्या ठिकाणी रस्ता खोदून ठेवलेला आहे, त्याठिकाणावरून आता वाहन नेताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. पावसाने खोदून ठेवलेले रस्ते चिखलमय झाले आहेत. त्यामुळे या रस्त्याच्या कामाचा वेग वाढविण्याची गरज आहे.
घाट, वळणमार्ग ठरतोय धोक्याचा
बुलडाणा ते धाड मार्गावर येणारा घाट व वळणमार्गाच्या ठिकाणीही रस्त्याचे खोदकाम झालेले आहे. खोदकाम झाल्यानंतर त्याठिकाणी रस्ताचे काम सुरू झालेले नाही. त्यामुळे पाऊस येताच या रस्त्यावरील घाट व वळण मार्ग धोक्याचा ठरत आहे.
अर्धवट कामाने वाढली डोकेदुखी
बुलडाणा-औरंगाबाद मार्गाचे काम बºयाच ठिकाणी अर्धवट झालेले आहे. दोन ते तीन किलोमिटरचा रस्ता पूर्ण केल्यानंतर पुन्हा काही अंतरावरचे काम रखडलेले आहे. थोड्या-थोड्या अंतरावर या रस्त्याचे काम केलेले आहे. या अर्धवट कामामुळे वाहनचालकांची डोकेदुखी वाढली आहे.
धाड येथे रस्तावर साचते पाणी
बुलडाणा ते औरंगाबाद रोडवर धाड येथे मोठ्या प्रमाणावर पाणी साचत आहे. त्याचबरोबरच चिखलही निर्माण होत आहे. धाड बसथांब्याच्या ठिकाणचा हा रस्ता सध्या अपघातास आमंत्रण देणारा ठरत आहे.