बुलडाणा जिल्ह्यात दररोज शेकडो वाहनांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 10:24 AM2020-04-20T10:24:06+5:302020-04-20T10:24:53+5:30
कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी प्रशासन तत्पर असले तरी नागरिक मात्र बेफिकीर असल्याचा प्रत्यय येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : ‘कोरोना’ बाधितांचा वाढता आकडा लक्षात घेता जिल्ह्यातील प्रमाण रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नागरी भागात १०० टक्के ‘लॉकडाउन’चे आदेश दिले आहेत. नागरिकांकडून या आदेशाचे सतत उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. जिल्हाभरात पोलिसांकडून दररोज शेकडो वाहनधारकांवर कारवाई करण्यात येत आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी प्रशासन तत्पर असले तरी नागरिक मात्र बेफिकीर असल्याचा प्रत्यय येत आहे.
जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा २१ वर पोहचला आहे. यामध्ये बुलडाणा, देऊळगावराजा, सिंदखेडराजा, चिखली, चितोडा गाव, मलकापूर, शेगाव शहर इत्यादी ७ ठिकाणी रुग्ण आढळून आलेले आहेत. जळगाव जामोद, संग्रामपूर, नांदुरा, मोताळा, मेहकर व लोणार तालुक्यांमध्ये सध्या एकही ‘कोरोना’ पॉझिटीव्ह रुग्ण नाही. मात्र तरीदेखील कोरोना विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी सर्वांनाच खबरदारी घेण्याची गरज आहे. बंदी असताना नागरिक दुचाकी घेऊन रस्त्यावर येत असल्याचे चित्र आहे. या परिस्थितीवर नियंत्रण ठेवताना पोलिसांची प्रचंड दमछाक होत आहे. जिल्ह्यातील सर्व शहरी भागात दररोज जवळपास शेकडो दुचाकी वाहनधारकांवर कारवाई करण्यात येत आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासन तत्पर असले तरी नागरिक मात्र बेफिकीर असल्याचे पाहायला मिळत आहे.
जीवनावश्यक वस्तू घरपोच!
नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने शहरी भागात जीवनावश्यक वस्तू घरपोच पोहचविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी किराणा, भाजीपाला व दूध विक्रेत्यांचे क्रमांकही सोशल मिडीयावर प्रसारीत करण्यात आले आहे. मात्र काही नागरिक विनाकारण बाहेर पडत असल्याने नियमाचे उल्लंघन होत आहे.