एसटीत वाहतूक नियमांची पायमल्ली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 04:51 PM2019-06-23T16:51:28+5:302019-06-23T16:52:52+5:30
चालक सर्रास मोबाईल कानाला लाऊन बस चालवित असल्याने प्रवाशांना वेठीस धरल्या जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : एसटीत वाहतूक नियमांची पायमल्ली होताना दिसून येत आहे. बस चालविताना मोबाईलवर बोलणे बंधनकारक असतानाही, चालक सर्रास मोबाईल कानाला लाऊन बस चालवित असल्याने प्रवाशांना वेठीस धरल्या जात आहे.
वाहन चालविताना मोबाईल संभाषण करणे धोकादायक असतानाही, चालक या नियमाची सर्रास पायमल्ली करताना दिसून येत आहेत. विशेष करून एस टी बस चालविताना अतिशय धोक्याचे आहे. यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत. परंतु तरीही वाहनचालक मोबाईलचा वापर टाळत नसल्याचे दिसून येत आहे. एखाद्यावेळी प्रवाशाने चालकाला बस चालविताना मोबाईलवर बोलू नका, असे म्हटल्यास प्रवाशांसोबत हुज्जत घालण्याचे प्रकारही घडतात. एकंदरीत यामुळे प्रवाशांचा जीव टांगणीला लागतो.
असाच प्रकार शेगाव ते जळगाव जामोद, शेगाव ते खामगाव, अकोला ते खामगाव या बसेसमध्ये बसचालक मोबाईलवर संभाषण करीत असलेल्याचे दिसून आले. शेगाव ते जळगाव जामोद बस क्रमांक एम.एच.२० बी. ५६९३, शेगाव ते खामगाव बस क्रमांक एम.एच. १४ सी. डी. ७२७३ व अकोला ते खामगाव बस क्रमांक एम.एच. १२ सी. २५२८ या बसचे चालक बस चालविताना मोबाईलवर संभाषण करीत होते. यामुळे प्रवाशांचा जीव टांगणीला लागला. विशेष म्हणजे बस चालकांचे बस चालविताना मोबाईलवर बोलणे, हे चित्र सध्या सर्रास पाहायला मिळत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)