धान्य वाहतूक वाहनांच्या ‘टोल’ पावत्याही गहाळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 03:09 PM2018-12-19T15:09:28+5:302018-12-19T15:09:37+5:30
खामगाव : गोंदीयासह इतर जिल्ह्यातून बुलडाणा जिल्ह्यात धान्य वाहतूक करणाºया अनेक वाहनांच्या टोल टॅक्स पावत्या गहाळ असल्याचे दिसून येते.
- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : गोंदीयासह इतर जिल्ह्यातून बुलडाणा जिल्ह्यात धान्य वाहतूक करणाºया अनेक वाहनांच्या टोल टॅक्स पावत्या गहाळ असल्याचे दिसून येते. धान्य वाहतूक करणाºया वाहनांच्या टोल पावत्या तात्काळ सादर करण्याच्या जिल्हाधिकाºयांच्या निर्देशाला सतत दोन महिन्यांपासून जिल्हा पुरवठा विभागाकडून केराची टोपली दाखविली जात आहे. धान्य वाहतूक कंत्राटदाराला पाठीशी घालण्यासाठी हा खटाटोप सुरू असल्याने, याप्रकरणी जिल्हाधिकाºयांनी गंभीर आक्षेप नोंदविल्याचे समजते.
बुलडाणा जिल्ह्यातील रेशन धान्य घोटाळ्याला जिल्हा पुरवठा विभागाकडून खतपाणी घातले जात असल्याची धक्कादायक वस्तुस्थिती वेळोवेळी समोर आली आहे. धान्याची वाहतूक करताना अफरातफरीसोबतच ‘स्वस्त धान्याचा ट्रक कोठे जाणार; याची नोंद नसल्याचा प्रकार म्हणजेच‘स्टेटमेंट-२’च्या घोळाचा प्रकार एप्रिल महिन्यात उजेडात आला. तर जुलै महिन्यात‘ट्रान्सपोर्ट पास’ देयकाचा घोळ उघडकीस आला. ट्रान्सपोर्ट पासचा देयकाचा प्रकार ताजा असतानाच, गोंदीया, भंडारा, नागपूर आणि इतर जिल्ह्यातून बुलडाणा जिल्ह्याकरीता झालेल्या धान्य वाहतूक संदर्भातील वाहनांचे टोल नाक्यावरील टोल टॅक्स भरल्या बाबतच्या पावत्या गहाळ असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे.
जिल्ह्यात सार्वजनिक वितरण प्रणालीच्या धान्य वाहतुकीमध्ये टोल नाक्यावरील नोंदीच्या आधारे पडताळणी केली असता, अनेक वाहने वाहने नियोजित ठिकाणी पोहोचले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली. यासंदर्भात अधिक माहितीसाठी जिल्हा पुरवठा अधिकाºयांशी संपर्क साधला असता, त्यांच्यांशी संपर्क होवू शकला नाही.
कृष्णूर धान्य घोटाळ्याची आठवण ताजी!
नांदेड जिल्ह्यातील कृष्णूर शासकीय धान्य घोटाळ्यासारखाच हा घोळ असल्याची चर्चा आहे. नांदेड जिल्ह्यातील बिलोली आणि देगलूर येथील पुरवठा विभागात तब्बल १९३ ट्रकची नोंद टोलनाक्यावर नसल्याची धक्कादायक बाब उजेडात आली होती. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातही इतर जिल्ह्यातून खरोखरं धान्य वाहतूक झाली अथवा नाही?, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केल्या जात आहे.
जिल्हाधिकाºयांचे पुरवठा विभागाला पत्र!
बुलडाणा जिल्ह्यात धान्य वाहतूक केलेल्या वाहनांचे टोल नाक्यावरील टोल टॅक्स भरल्या बाबतच्या पावत्या संबंधीत वाहतूक कंत्राटदारांकडून तात्काळ प्राप्त करून विना विलंब सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी २४ आॅक्टोबर २०१८ रोजी निर्गमित केले. मात्र, आदेशीत तारखेपासून अद्यापपर्यंतही या पावत्या जमा करण्यात आल्या नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.