बुलडाण्यात क्रीडा शिक्षकांसाठी प्रशिक्षण शिबीर; दोन सत्रात चालणार शिबीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 01:45 PM2018-03-13T13:45:45+5:302018-03-13T13:45:45+5:30
बुलडाणा :क्रीडा शिक्षकांसाठी प्रशिक्षण शिबीर क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलडाणा यांचेमार्फत २२ ते ३१ मार्च या कालावधीत दोन सत्रात घेण्यात येणार आहे.
बुलडाणा : राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार, प्रसार व जोपासना करण्यासाठी पोषक वातावरण असणे आवश्यक आहे. याच भूमिकेतुन राज्याचे क्रीडा धोरण २०१२ नुसार क्रीडा शिक्षकांसाठी प्रशिक्षण शिबीर क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलडाणा यांचेमार्फत २२ ते ३१ मार्च या कालावधीत दोन सत्रात घेण्यात येणार आहे. खेळामधील बदललेले आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षणाच्या पध्दती, खेळामधील कौशल्याची ओळख, नविन खेळांची ओळख, खेळांची शास्त्रोक्त माहिती वेळोवेळी शिक्षकांना करुन देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना योग्य क्रीडा प्रशिक्षण मिळण्यासाठी क्रीडा शिक्षकांचे अद्यावत प्रशिक्षण असणे आवश्यक आहे. या पार्श्वभुमीवर क्रीडा प्रशिक्षकांसाठी २२ मार्चपासून बुलडाणा येथील जिल्हा क्रीडा संकुलवर प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबीरासाठी जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळा, शासन मान्यताप्राप्त अनुदानीत, विनाअनुदानीत प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा यातील क्रीडा शिक्षक भाग घेऊ शकतील. तसेच या प्रशिक्षणाद्वारे विविध वयोगटातील खेहाडू घडविणे व खेळाडूच्या कामगिरीस प्राविण्य निर्माण करण्याच्या दृष्टीने क्रीडा शिक्षकांच्या ज्ञानात भर पडावी व त्यादृष्टीने जिल्ह्यातील क्रीडा शिक्षकांची क्रीडा विषयक उजळणी करुन दरवर्षी होणारे नियमातील बदल त्यांच्या निदर्शनास आणुन त्याची माहिती या शिबीराच्या माध्यमातुन अवगत करुन देण्यात येईल. या शिबीराला तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून मार्गदर्शन करण्यात येईल. क्रीडा क्षेत्रातील प्राधान्यक्रमातील १९ खेळांचे तज्ज्ञ क्रीडा प्रशिक्षक किंवा संघटनेचे तांत्रीक पदाधिकारी तसेच आहारतज्ज्ञ, शारीरविज्ञान तज्ज्ञ, क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ आदींचे मार्गदर्शन करण्यात होईल. सदर शिबीरामध्ये क्रीडा शिक्षकांना क्रीडा गणवेश, क्रीडा साहित्य, क्रीडा हस्तपुस्तीका, भोजन व निवास, प्रवास खर्च, इ. चा समावेश राहील.