शेतकऱ्यांना मिळणार प्रशिक्षण!
By Admin | Published: May 22, 2017 12:30 AM2017-05-22T00:30:08+5:302017-05-22T00:30:08+5:30
‘उन्नत शेती, समृद्ध शेतकरी’ अभियान : एका कृषी सहायकाला १० हेक्टरचे टार्गेट
सिद्धार्थ आराख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर : एका दाण्याचे हजार दाणे करण्याची किमया असलेल्या शेतकऱ्याला शेती कशी करायची याची परिपूर्ण जाणीव आहे. मात्र पारंपरिक शेती करताना त्याच्या उत्पन्नात पाहिजे तशी भर पडत नसल्याने आता शासनाच्या कृषी विभागाच्यावतीने ‘उन्नत शेती, समृद्ध शेतकरी’ या योजनेंतर्र्गत शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याचा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याकरिता कृषी विभागाच्यावतीने एका कृषी सहायकाला त्याच्या कार्यक्षेत्रातील १० हेक्टर शेतीचे टार्गेट देण्यात आले आहे.
आजही शेतकरी पारंपरिक पद्धतीनेच शेती करीत असल्याने त्याच्या उत्पन्नात घट होत आहे, अशी भावना शासनाची झाल्याने हा उपक्रम हाती घेण्यात आल्याचे सांगितल्या जात आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक गावात २५ शेतकऱ्यांचा एक गट तयार करून, या गटाला कृषी तज्ज्ञाकडून मार्गदर्शन दिले जाणार आहे. शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांना नव्या पद्धतीने शेती करण्याचे प्रशिक्षण या माध्यमातून होणार आहे. हा उपक्रम राबविताना कृषी सहायकाला सुद्धा शेतकरी गटाच्या माध्यमातून प्रशिक्षण मिळणार आहे. या अभियानात कपाशी, तूर आणि सोयाबीन या पिकाच्या उत्पादन वाढीचे तंत्र शिकविल्या जाणार आहे. कृषी विभागाच्या नर्सरीत हे प्रशिक्षण वर्ग होणार आहेत. विशेष म्हणजे या उपक्रमात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना बियाणे, खते व औषधी मोफत दिली जाणार आहे. एकीकडे दिवस-रात्र शेतात राब राब राबून उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेती मालाला भाव मिळत नसल्यामुळे सध्या राज्यभर शेतकरी अडचणीत आला असताना कृषी विभागाच्यावतीने उत्पन्न वाढीसाठी प्रशिक्षण देण्याची योजना राबविल्या जात असल्याचा हा विरोधाभास अनेक शेतकऱ्यांनी बोलून दाखविला. शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या या शेतकरी प्रशिक्षण अभियानासाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनीसुद्धा पुढाकार घेणे महत्त्वाचे आहे. अन्यथा कृषीच्या अनेक योजनेमध्ये पुन्हा एका योजनेची नुसती भर पडायला नको.
शेतकऱ्यांना खत व बियाणाचा पुरवठा
या अभियानात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी विभागाच्यावतीने मोफत बियाणे, खत व औषधी देण्यात येणार असल्याचे सांगितल्या जात आहे. मात्र बी अंकुरल्यानंतर त्यांना देण्यात येणारे खत आणि फवारणीसाठी लागणाऱ्या औषधीचा खर्च हा सुरुवातीला शेतकऱ्यांना करावा लागणार आहे. हा खर्च मात्र प्रयोगानंतर अनुदानाच्या स्वरूपात शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले. म्हणजे पुन्हा अनुदानासाठी शेतकऱ्यांना कृषी विभागाचे उंबरठे झिजवावे लागणार आहेत.
जिल्ह्यात शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद
कृषी विभागाच्यावतीने या अभियानास रोहिणी नक्षत्रापासून सुरुवात होणार आहे. त्यासाठी कृषी सहायकाकडून शेतकऱ्यांच्या भेटी गाठी घेऊन त्यांना माहिती देण्यात येत आहे. मात्र शेतकऱ्यांकडून या योजनेला प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती कृषी सहायकाने ‘लोकमत’शी बोलताना दिली.
महाबीजकडून मिळणार शेतकऱ्यांना बियाणे
या उपक्रमात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना बियाणे, रासायनिक खते, औषध मोफत दिली जाणार आहे. त्यासाठी महाबीज शेतकऱ्यांना बियाणे पुरविणार आहे. मात्र, या बियाण्याबद्दल शंका आहे. मागील वर्षी शेतकऱ्यांनी महाबीजचे बियाणे पेरले होते, त्यातील अनेक शेतकऱ्यांचे बियाणे उगवलेच नव्हते.