विदर्भातील तृतीयपंथीयांचा मलकापूर शहर पोलीस ठाण्यात हल्ला बोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 19:03 IST2021-05-18T18:59:42+5:302021-05-18T19:03:29+5:30
Malkapur News : या बाबीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने ही घटना समोर आली आहे.

विदर्भातील तृतीयपंथीयांचा मलकापूर शहर पोलीस ठाण्यात हल्ला बोल
मलकापूर : एका तृतीयपंथीयांच्या घरी चोरीची घटना घडली. तक्रारी दरम्यान संशयितांची नावेही सांगण्यात आली परंतु त्या दिशेने तपास करण्यात येत नसल्याचा आरोप करीत तृतीयपंथीयांनी एकजूट होत मलकापूर शहर पोलीस स्टेशनवर हल्लाबोल केला. दरम्यान आपल्या नेहमीच्या शैलीने निषेध सुद्धा व्यक्त केला. या बाबीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने ही घटना समोर आली आहे.
शहरातील पंत नगरमध्ये राहत असलेली मोगराबाई यांच्याकडे ७ मे रोजी रात्री दोन वाजताच्या दरम्यान काही लोकांनी घरात घुसून घरातील लोकांना धाक दाखवत रोख ५० हजार रुपये, बँक पासबुक, आधारकार्ड आणि दागिने असा पाच लाखापर्यंत ऐवज लुटून नेला, अशी तक्रार पोलिसात दिली होती. त्यावेळी काही संशयितांची नावे सुद्धा सांगितले होती. त्या दिशेने पोलिसांनी कारवाई करणे अपेक्षित असताना तसे झाले नाही. त्यामुळे पोलिसांनी कारवाई न केल्याचा आरोप करीत फिर्यादी मोगराबाई यांनी ही बाब विदर्भातील तृतीयपंथी समाजाच्या कानावर टाकली. १७ मे रोजी नागपूर, अमरावती, अकोला, चंद्रपूर, जळगाव खान्देश या जिल्ह्यातील काही किन्नरांनी मलकापूर गाठले. मोगराबाईच्या तक्रारीनुसार तपास करण्याची करण्याची मागणी केली. दरम्यान जमलेल्या तृतीयपंथीयांनी कपडे काढून पोलीस स्टेशनचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. आरडाओरड केली. एवढेच नव्हे तर काही तृतीयपंथीयांनी आपले कपडे काढण्याचे प्रयत्न करताच पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्यांनी तेथून काढता पाय घेतला. एक तास चाललेल्या या गोंधळात पोलिसांना सर्वांची समजूत काढावी लागली. त्यामुळे प्रकरण शांत झाले. मात्र या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शहरात चर्चा रंगू लागली. पोलिस प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर सुद्धा या प्रकरणाने चांगलेच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
फोटो : शहर पोलिस ठाण्यात धडक देत पोलिसांना जाब विचारतानाा विदर्भातील तृतियपंथी.