बुलडाणा जिल्ह्यात ९५० प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या स्थगीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 11:06 AM2020-08-12T11:06:00+5:302020-08-12T11:06:16+5:30
बुलडाणा जिल्हा परिषदच्या ९५० प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या स्थगीत करण्यात आल्याने शिक्षण वर्तुळात खळबळ उडाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : राज्यात सर्वत्र जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांचे वारे सुरू आहे. कोरोनाच्या पृष्ठभूमीवर यंदा विनंती बदल्यांच्या सुचना शासनाने दिल्या होत्या. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बुलडाणा जिल्हा परिषदच्या ९५० प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या स्थगीत करण्यात आल्याने शिक्षण वर्तुळात खळबळ उडाली आहे. विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व माध्यमिक शिक्षकांचे समुपदेशन करण्यात आले आहे.
जिल्ह्यात गतवर्षी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांमध्ये गोंधळ झाल्याने अनेक शिक्षकांच्या बदल्या रखडल्या होत्या. त्यामुळे बऱ्याच शिक्षकांना २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात होणाºया बदल्यांची प्रतीक्षा होती. शिक्षकांच्या बदल्यांसदर्भात राज्य शासनाच्यावतीने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता शिक्षकांच्या बदल्या आॅफलाइन पद्धतीने करण्याचे आदेश राज्याच्या ग्रामविकास मंत्रालयाच्यावतीने देण्यात आले होते. बदल्यांसाठी शिक्षकांची गर्दी होऊन कोरोना विषाणू संसर्ग वाढू नये, यासाठी प्रशासकीय बदल्या करणे योग्य नव्हते; त्यामुळे केवळ विनंती बदल्या शासनाने कराव्या, अशी मागणी शिक्षक संघटनांच्यावतीने करण्यात आली होती. दरम्यान, शासनाने शिक्षकांच्या विनंती बदल्यांना ‘ग्रीन सिग्नल’ दिला. जिल्ह्यात एकूण ९५० प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या करण्यात येणार होत्या. परंतू कोरोनामुळे केवळ विनंती बदल्या करण्याबाबतचे पत्र आले. त्यामुळे बदल्यांची प्रक्रिया पुन्हा बदलली. त्याुनसार जिल्ह्यातील शिक्षकांनी विनंती बदल्याबाबतचे अर्जही शिक्षण विभागाकडे केले होते. परंतू ह्या बदल्या शासनाच्या नियमानुसार घेणे कोरोनामुळे शक्य नसल्याने बुलडाणा जिल्हा परिषदकडून प्राथमिक शिक्षकांच्या बदल्याच स्थगीत करण्यात आल्या. ह्या बदल्या आॅफलाइन होत्या, शिवाय यामध्ये शिक्षकांचे समुपदेशन घेणे आवश्यक होते.
प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या स्थगीत करण्यात आल्या आहेत. शासनाला अहवाल पाठविण्यात आला आहे. कोरोनाच्या धरतीवर गर्दी वाढेल आणि कोरोना विषाणूचा ससंर्ग वाढेल, त्यामुळे खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. शासन निर्णयानुसार बदल्या करण्यास अडचणी असल्याकारणारे बदल्यांना स्थगीती देण्यात आली आहे.
-एजाज खान, प्राथमिक शिक्षणाधिकारी, बुलडाणा.