वैद्यकीय तपासणी न करताच प्रवाशांची वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 11:16 AM2020-07-26T11:16:23+5:302020-07-26T11:16:32+5:30
बुलडाणा जिल्ह्यात पोलिस प्रशासनाने अलिकडील काळात केलेली ही दुसरी कारवाई आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : प्रवाशांची वैद्यकीय तपासणी न करताच खासगी बसद्वारे प्रवाशी वाहतूक केल्याप्रकरणी सुरत येथील एका बसचालक दिलीप अवधूत चौधरी (४१, रा. राजा कौतीक नगर, जामनेर, जि. जळगाव) याच्या विरोधात साथ रोग प्रतिबंधक व आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा आधार घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुलडाणा जिल्ह्यात पोलिस प्रशासनाने अलिकडील काळात केलेली ही दुसरी कारवाई आहे. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयानेही यापूर्वी अशाच पद्धतीने काही खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केलेली आहे. त्यामुळे मधल्या काळात अशा प्रकारच्या प्रवाशी वाहतुकीस लगाम लागला होता. मात्र शनिवारी करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अशा प्रकारे प्रवाशांची वाहतूक सुरूच असून त्यामुळे कोरोनाचा संसर्ग अधिक वेगाने पसरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
पोलिस उपनिरीक्षक सुधाकर गवारगुरू व त्यांचे सहकारी २५ जुलै रोजी सकाळी गस्तीवर असताना सुतर येथून राजस्थानमधील चालक गणपतसिंह ओनाडसिंह (३९) हा जीजे-०५-बीव्ही-८०७१ क्रमांकाचे खासगी प्रवाशी वाहन घेवून जात असल्याचे निदर्शनास आले. त्यास थांबवून विचारणा केली असता वाहनातील प्रवाशांकडे वैद्यकीय तपासणीचा कुठलाही अहवाल नव्हता. या वाहनात एकूण २४ प्रवाशी होती. सुरत येथून ते चिखली येथे या वाहनाद्वारे जात होते.