५० किमीच्या अंतरात प्राचीन मंदिरांचा खजिना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:36 AM2021-08-23T04:36:14+5:302021-08-23T04:36:14+5:30
ही मंदिरे बघितल्यावर पुरातन बांधकाम शैली किती विकसित होती, याचा प्रत्यय येतो. लाकडावरही विविध यंत्राच्या साहाय्याने सध्याच्या काळातही कोरीव ...
ही मंदिरे बघितल्यावर पुरातन बांधकाम शैली किती विकसित होती, याचा प्रत्यय येतो. लाकडावरही विविध यंत्राच्या साहाय्याने सध्याच्या काळातही कोरीव काम करणे शक्य होणार नाही, तसे कोरीव काम दगडावर करण्यात आले आहे. बाराव्या शतकापूर्वी मंदिरांचे बांधकाम झाले असावे, असा अंदाज आहे. काळ्या पाषाणांपासून हे मंदिर बांधण्यात आले आहे. या दगडांवर कोरलेल्या मूर्ती व शिल्प अप्रतिम आहेत. चिखलीपासून पाच ते सहा किमी अंतरावर असलेल्या सातगाव येथे प्राचीन मंदिर आहे. या परिसरात चार मंदिरे आहेत. एका मंदिरात महादेवाची पिंड आहे. या चारही मंदिरावर चहुबाजूने शिल्प, विविध मूर्ती व नक्षीकाम कोरले आहे. संपूर्ण दगडाचे असलेल्या या मंदिर परिसरात काही अन्य मूर्तीही पडल्या आहेत. यापैकी सर्वांत मोठे असलेले विष्णू मंदिर भूमिज स्थापत्याचा नमुना आहे. या मंदिरावर पुरातत्व खात्याच्या वतीने रासायनिक प्रक्रिया करण्यात आली आहे. मंदिरावरील शेवाळ व धूळ निघाल्यामुळे मंदिर उजळले आहे. विष्णू मंदिराचा अर्धमंडप, मंडप, अंतराल आणि गर्भगृह यावरील शिखरे सध्या पडली आहेत. याची डागडुजी करण्यात आली आहे. विष्णूचे मंदिर पश्चिमाभिमुख असून, पुढे मुखमंडप व दोन बाजूला दोन अर्धमंडप असलेला अर्धखुला मंडप आहे. येथे तीन अर्धखुले मंडप असल्यामुळे मंदिरात तिन्ही बाजूंनी जाता येते.
या मंदिराच्या मागच्या बाजूला महादेवाचे मंदिर आहे. या मंदिरामध्ये नागाची मूर्ती ठेवलेली आहे. मंदिरावरील समोरच्या भागात प्रवेशद्वारावर बारिक शिल्पकृती कोरण्यात आली आहे. दगडावर केलेली ही अप्रतिम कलाकृती पाहून मन थक्क होते. या परिसरात विविध मूर्ती अस्ताव्यस्त पडलेल्या आहेत. या मूर्ती कोणत्या कालखंडात बनविण्यात आल्या असून, कुणाच्या आहेत, याचा शोध घेणे आवश्यक आहे. येथे चार फूट उंच सूर्यपत्र रेवंतची मूर्ती आहे. येथे देवी व देवतांच्या मूर्ती कोरल्या असलेले दगड पडलेले आहेत. यापैकी काही मूर्ती पूर्ण तर काही मूर्ती भंगलेल्या आहेत. या मूर्ती देवदेवतांच्या आहेत.