वृक्ष लागवड मोहिमेस खामगावात तिलाजंली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 01:00 PM2018-07-17T13:00:43+5:302018-07-17T13:04:37+5:30
सर्वत्र १३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा गाजावाजा सुरू असतानाच, खामगावातील नटराज गार्डन परिसरात एक सप्तपर्णीवृक्ष धराशाही करण्यात आले.
खामगाव: हिरवळ वाढविण्यासाठी शासनस्तरावर मोठ्याप्रमाणात वृक्षलागवड मोहिम सुरू करण्यात आली आहे. सर्वत्र १३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा गाजावाजा सुरू असतानाच, खामगावातील नटराज गार्डन परिसरात एक सप्तपर्णीवृक्ष धराशाही करण्यात आले. पुरावा नष्टकरण्यासाठी हा वृक्ष रातोरात गायबही करण्यात आला. याप्रकरणी पालिका, शहर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
खामगाव शहरातील नटराज गार्डन परिसरात गेल्या दोनतीन दिवसांपूर्वी पालिका प्रशासनासोबतच इतर कोणत्याही विभागाची परवानगी न घेता, सप्तपर्णी वृक्ष तोडण्यात आले. त्यानंतर ताबडतोब या वृक्षाची लाकडे घटना स्थळावरून गायब करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला. सप्तपर्णी वृक्ष तोडण्यात आल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी या ठिकाणी पेव्हर्सही बसविण्यात आले. याप्रकरणी नगर पालिका प्रशासनासोबतच शहर पोलिसांमध्येही तक्रार दाखल करण्यात आल्याचे समजते. याप्रकरणी पालिका प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे दिसून येते. एकीकडे वृक्ष लागवडीसाठी नगर पालिका प्रशासनाची लगबग सुरू असतानाच, दुसरीकडे वृक्षतोडीसारख्या प्रकाराकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्या जात असल्याची ओरड होत आहे.
पर्यावरणाचा ºहास!
पालिका प्रशासनाकडून १३ कोटी वृक्ष लागवडीला हातभार म्हणून नगर पालिका परिसरात वृक्ष लागवड केली जात आहे. काही सामाजिक संघटनाच्यावतीनेही वृक्ष लागवड मोहिमेला हातभार लावण्यात येत आहे. मात्र, काही नागरिकांकडून पर्यावरणाचा ºहास करण्यात येत असल्याचे चित्र शहरात दिसून येते.
पालिकेकडे अद्याप तक्रार प्राप्त नाही. तक्रार प्राप्त होताच यासंदर्भात कारवाई प्रस्तावित केली जाईल.
- शंकर नेहारे, वृक्षाधिकारी, नगर परिषद, खामगाव.