‘वृक्ष वल्ली’ पोहचणार आता शेतात; बुलडाणा जिल्ह्यात वनशेती उपअभियानाला सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 05:27 PM2018-10-07T17:27:10+5:302018-10-07T17:29:19+5:30
- ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा : शेती उत्पादनासह वृक्ष लागवड वाढविण्यासाठी जिल्ह्यात वनशेती उपअभियान हाती घेण्यात आल्याने ‘वृक्ष वल्ली’ आता शेतात पोहचणार आहे. त्यासाठी शेतकºयांना चार टप्प्यात अनुदान देण्यात येत आहे. या अभियानाच्या अंमलबजावणीचे हे पहिले वर्ष असून जिल्हा फळरोपवाटीकेकडून २५ हजार रोपे उपलब्ध करून देण्यात आले आहे.
राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत शेती उत्पादनासह वृक्ष लागवड वाढविण्यासाठी राज्यभर वन शेती उपअभियान राबविण्यात येत आहे. वनशेतीला प्रोत्साहन देण्यासह शेतकºयांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी हे अभियान उपयुक्त असून, यासाठी शेतकºयांना आलेल्या खर्चाच्या ५० टक्के अनुदान देण्यात येत आहे. या अभियानामुळे वातावरणातील बदल आणि पावसाच्या लहरीपणामुळे जोखमीचा झालेला शेती व्यवसाय शाश्वत करण्यासह शेतकºयांच्या उत्पादनात वाढ करणे फायद्याचे होणार आहे. वनशेतीमुळे नैसर्गिक साधनांचे संवर्धन होऊन वातावरणातील बदल काही प्रमाणात सौम्य होऊ शकते. केंद्र शासनाच्या सूचनांनुसार राबविण्यात येणाºया वन शेती उपअभियानाची अंमलबजावणी व नियोजनामध्ये कृषी आणि वन विभागाचा सहभाग महत्त्वाचा आहे. शेतकºयांच्या जमीनीवर हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याने अल्प व अत्यल्प भूधारक शेतकºयांच्या उत्पन्नात वाढ, रोजगाराच्या संधी, उत्पन्न आणि उपजिविकेचे साधन निर्माण करणे हा प्रमुख उद्देश या अभियानाचा आहे. जिल्ह्यात वन शेती उपअभियानाच्या अंमलबजावणीला सुरूवात झाली असून त्यासाठी जिल्हा फळरोपवाटीककडे २५ हजार रोपे उपलब्ध करण्यात आले आहेत. शेतकºयांचा वनशेतीकडे कल वळविण्याकरीता वनशेतीसाठी शासकीय रोपवाटीकेतून रोपे देण्यात येत आहेत.
आठ कोटी रुपये निधी
वृक्षतोड व लाकूड वाहतुकीचे नियम शिथिल करणाºया राज्यांत हे उपअभियान राबवण्यात येते. या अभियानासाठी २०१७-१८ या आर्थिक वर्षामध्ये राज्यात सुमारे ८ कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. त्यानुसार सध्या राज्यभर वनशेती उपअभियानाची अंमलबजावणी सुरू आहे.
वन शेती उपअभियान अंतर्गत विविध रोपे शासकीय फळरोपवाटीकेमध्ये उपलब्ध आहेत. लागवडीसाठी शेतकºयांना टप्प्या-टप्प्याने अनुदान देण्यात येणार आहे.
- मयुरी खलाणे,
कृषी अधिकारी, जिल्हा फळरोपवाटीका बुलडाणा.