सोशल मिडीयावर वाढला चॅलेजचा ट्रेंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 12:16 PM2020-09-27T12:16:13+5:302020-09-27T12:16:46+5:30
काही दिवसांपासून फेसबुकवर कपल चॅलेंज, बहीण भाऊ चॅलेंज, सिंगल चॅलेंज, फॅमिली चॅलेंज, खाकी चॅलेंज सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : गत काही दिवसांपासून फेसबुक व इतर समाज माध्यमांवर विविध चॅलेंजचा ट्रेंड वाढत आहे. या चॅलेंज अंतर्गंत अनेक मुली आणि महिला आपले फोटो सोशल मिडीयावर अपलोड करीत आहेत. मात्र, या फोटांचा दुरपयोग करून मुलींना ब्लॅकमेल करणारेही सक्रीय असल्याने पोलिसांनी सावधगीरी बाळगण्याची सुचना केली आहे.
अनलॉक सुरू झाले असले तरी अनेक जण घरातच राहणे पसंत करीत आहेत. त्यामुळे, घरात राहत असलेले अनेक जण सोशल मिडीयावरच वेळ घालवत आहे. काही दिवसांपासून फेसबुकवर कपल चॅलेंज, बहीण भाऊ चॅलेंज, सिंगल चॅलेंज, फॅमिली चॅलेंज, खाकी चॅलेंज सुरू आहे. घरातच वेळ घालवणाऱ्यांसाठी हे चॅलेंज विरंगुळा वाटत असल्याने त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. वेगवेगळ््या चॅलेंजच्या माध्यमातून महिला आणि मुली आपले फोटो समाज माध्यमावर अपलोड करीत आहेत. मात्र, या फोटोंचा दुरपयोग करून महिला आणि मुलींना ब्लॅकमेल करणारेही सक्रीय आहेत. त्यामुळे, असे फोटो टाकताना महिला आणि मुलींनी विशेष काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. कपल चॅलेंज किंवा फॅमिली चॅलेंज नावाने सर्च केल्यास अनेक महिला आणि मुलींचे फोटो सहज समाज माध्यमावर उपलब्ध होत आहेत. त्यामुळे, काही विकृत या संधीचा लाभ घेउन महिला आणि मुलींना ब्लॅकमेल करू शकतात. फोटो अपलोड करताना काळजी घेण्याचे तसेच कुणी ब्लॅक करीत असल्यास तक्रार करण्याचे आवाहन पोलिसांनी केली आहे.
असा आहे ट्रेंड
गत काही दिवसांपासून फेजबुकवर विविध चॅलेंज देण्यात येत आहे. या चॅलेंज अंतर्गंत अनेक जण पती-पत्नीबरोबरचे फोटो तर काही मुली नववारी, तसेच पाश्चिमात्य कपड्यांवर फोटो अपलोड करीत आहेत. चॅलेंज स्विकारण्याच्या नादात अनेक मुली फोटो अपलोडचा धोका पत्करत आहेत.
असा होऊ शकतो दुरपयोग
फेसबुक हे जगभरात पाहता येते. त्यामुळे, आतापर्यंत घडलेल्या अनेक गुन्ह्यांमध्ये देशाबाहेरील आरोपीच असल्याचे निष्पन्न झाले आहे. फेसबुकवर कपल चॅलेंजने सर्च केल्यास अनेक दाम्पत्याचे फोटो येतात. या फोटोमधील महिलांचे फोटो मार्फ (एडीट) करून दुसºया महिलेच्या जागेवर ठेवू शकतात. तसेच त्यांना सायबर गुन्हेगार ब्लॅकमेल करू शकतात.
महिलांनी सावधगीरी बाळगावी
सोशल मिडीयावर फोटो अपलोड करताना त्या वेबसाईटीची विश्वासहार्यता तपासून पहावी. तसेच फोटो अपलोड करताना महिला आणि मुलींनी काळजी घ्यावी. ज्यांनी फोटो अपलोड केले आहेत त्यांना कुणी ब्लॅकमेल करीत असेल तर तक्रार करावी,असे आवाहन पोलिस अधिक्षक अरविंद चावरीया, सायबर सेलचे ठाणेदार ठाकूर यांनी केले आहे.