आदिवासी वस्तीतील विद्यार्थी ‘इंटरनॅशनल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 12:05 PM2020-01-20T12:05:54+5:302020-01-20T12:06:23+5:30
८० टक्के आदिवासी बहुल वस्तीत असलेल्या या शाळेसोबत विद्यार्थीही आता ‘इंटरनॅशनल’ झाले आहेत.
बुलडाणा : लोणार तालुक्यातील टिटवी येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण घेत आहेत. येथे डिजिटल शाळेसोबत वैविध्यपूर्ण उपक्रम राबविण्यावर भर दिला जातो. ८० टक्के आदिवासी बहुल वस्तीत असलेल्या या शाळेसोबत विद्यार्थीही आता ‘इंटरनॅशनल’ झाले आहेत.
आदिवासी वस्तीतील मुलांना शाळेच्या प्रवाहात आणणे हे मोठे यश समजल्या जाते. परंतू लोणार तालुक्यातील टिटवी येथील जिल्हा परिषद शाळेने या पालिकडे काम केले आहे. टिटवी या आदिवासी बहुल वसतीतील मुलांना शाळेच्या प्रवाहात आणलेच; शिवाय शाळेला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचविणे हे मोठे यशाचे गमक आहे. एक विद्यार्थी स्थलांतरित होऊ नये व शाळेतील उपस्थिती वाढावी, यासाठी हंगामी वसतिगृह सुद्धा याच शाळेमध्ये चालवले जाते. दोन विद्यार्थ्यांना परिसराचे ज्ञान व्हावे, यासाठी शैक्षणिक सहली आयोजित केल्या जातात. शाळा डिजिटल झाली; शिवाय विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी जि. प. शाळेने उपलब्ध केली. इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शाळांनाही लाजवेल अशी ही शाळा आहे.
‘लीप फोर वर्ड’ची किमया
विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाचे ज्ञान व्हावे, यासाठी ‘लीप फोर वर्ड’चा उपक्रम टिटवी येथील जि. प. शाळेत राबविण्यात येत आहे. त्यामुळे मुले या शाळेतील सर्वच मुले अगदी सहजरित्या कुठल्याही शब्दाचे स्पेलींग तयार करतात. इंग्रजी शब्दसाठा वाढविण्यासाठी मोठी मदत विद्यार्थ्यांना होत आहे. इयत्ता तिसरीच्या मुलांसाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
गावातील तसेच परिसरातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी ही शाळा सतत प्रयत्नशील असते. यामुळे आदीवासी मुले शिक्षण क्षेत्रात पूढे येतील हे मात्र निश्चित.
-गोदावरी कोकाटे, जि. प. सदस्य.
शाळेच्या या यशामागे लोकसहभागही महत्त्वाचा आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे राहू नये, यासाठी आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमाची गरज आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येतो-
-विजय सरकटे, मुख्याध्यापक