आदिवासी विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचीत !
By admin | Published: December 22, 2014 11:44 PM2014-12-22T23:44:40+5:302014-12-22T23:44:40+5:30
प्रशासनाचे दुर्लक्ष : शाळा व्यवस्थापनच लाटते पैसा.
बुलडाणा :सुवर्ण महोत्सवी आदिवासी पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजनेपासून मागील तीन वर्षापासून अकोला, बुलडाणा अणि वाशिम जिल्ह्यातील विद्यार्थी वंचीत आहेत. विशेष म्हणजे अनेक शाळा व्यवस्थापनांनी विद्यार्थ्यांच्या या शिष्यवृत्तीचा पैसा दुसरीकडेच वापरला आहे.
राज्यातील अनुदानित, विना अनुदानित, प्राथमिक आणि माध्यमिक शाळा तसेच जिल्हा परिषद व नगरपालिकांच्या शाळेत इयत्ता पहिली ते दहावीपर्यंंत शिक्षण घेणार्या आदिवासी विद्यार्थ्यांना राज्य शासन शिष्यवृत्ती देते. विद्यार्थ्यांना शैक्षणिक व इतर खर्च भागविता यावा यासाठी ही सुवर्ण महोत्सवी आदिवासी पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती शासनाने २0१0-११ पासून सुरू केलेली आहे. प्रत्येक वर्षी पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांंना तीन टप्प्यात ही शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय संबंधित मुख्याध्यापकांच्या नावे धनादेश पाठवितात. मुख्यध्यापकांनी आलेला धनादेश वटवून या शिष्यवृत्तीचे वाटप विद्यार्थ्यांंना करावे असा नियम आहे. मात्र खासगी शाळातील व्यवस्थापनाचे पदाधिकारी सदर धनादेश परस्पर आपल्या खात्यात जमा करुन पैसे वापरतात. विशेष म्हणजे पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांंना आपल्याला अशा प्रकारची शिष्यवृत्ती मिळते याची माहितीही नसते. माहिती असली तरी खासगी शाळेतील मुख्यध्यापक अथवा व्यवस्थापनाला विचारण्याची कोणाची हिंमतही होत नाही. आता प्रत्येक विद्यार्थ्यांंचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडणे आवश्यक झाले आहे.