महाशिवरात्री उत्सवातून साधला त्रिवेणी संगम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 02:26 PM2020-02-21T14:26:17+5:302020-02-21T14:26:26+5:30
महाशिवरात्रीच्या पावणपर्वावर शिवनामस्मरणही होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : महाशिवरात्री उत्सवातून मेहकर तालुक्यातील मोळी येथील शिवमंदिरात त्रिवेणी संगम साधला आहे. येथे अखंड हरिनाम, ज्ञानेश्वरी पारायणासोबत शिवपुराण कथेचाही जागर होत आहे. महाशिवरात्रीच्या पावणपर्वावर शिवनामस्मरणही होत आहे.
वारकरी संप्रदायामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाला मोठे महत्व आहे. तसेच सर्वसामान्यांसाठी असणारा गीतेवरील ज्ञानेश्वरांचा हा टीकाग्रंथ मराठीतील सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. महाशिवरात्रीला शिवपुराण कथेलाही मोठे धार्मिक महत्त्व आहे. वारकरी संप्रदायात धार्मिक सामूहिक उपासना असलेला अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण आणि श्री शंकराची महती सांगणारी शिवपुराणक कथा एकाच व्यासपीठावर सुरू आहे. १५ फेब्रुवारीपासून विविध कार्यक्रम जिल्ह्यातील शिव मंदिरामध्ये सुरू आहेत. मेहकर तालुक्यातील मोळी येथील शिवमंदिरामध्ये शिवपुराणचा जागर सुरू आहे. २१ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री असून त्यानिमित्त शिवमंदिरात शिवनामस्मरणही होणार आहे. जिल्ह्यात शिवमंदिरांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामध्ये हेमाडपंती मंदिरांचाही समावेश आहे. या शिवमंदिरामध्ये महाशिवरात्रीच्या पर्वावर धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. मेहकर तालुक्यातील मोळी येथे यंदा महाशिवरात्री महोत्सवामध्ये सदाशिव महाराज वाघमारे हे शिवपुराण कथा वाचण करीत आहेत. तर ज्ञानेश्वरी पारायण वाचक शेषराव महाराज हे आहेत. धार्मिक उत्सवामध्ये असा त्रिवेणी संगम जुळण्याला मोठे महत्त्व आहे. या कार्यक्रमासोबतच मोळी येथे विष्णूसहस्त्रनाम, कीर्तनसेवाही पार पडत आहे. महाशिवरात्रीनिमित्त सायंकाळी गावातून शंकराची मिरवणूक काढण्यात येईल व २२ फेब्रुवारीला महाप्रसादाचे वाटप होईल.
संगीतमय कथेने आणली रंगत
शिवमंदिर मोळी येथे शिवपुराण कथा सुरू आहे. यामध्ये संगितमय कथा असल्याने भाविकांना आणखी आनंद मिळत आहे. संगित शिवपुराण कथेला श्रोतेवर्गही वाढल्याचे आयोजकांनी सांगितले.
महिला भजनी मंडळाची साथ
महाशिवरात्री महोत्सवामध्ये महिला भजनी मंडळ शिवचंद्र मोळी यांनी चांगली साथ दिली आहे. भजनी मंडळामुळे मातृशक्तीचा जागर येथे पाहावयास मिळाला आहे.