चराई क्षेत्र कमी झाल्यामुळे मेंढपाळ अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 04:43 PM2018-08-10T16:43:29+5:302018-08-10T16:46:29+5:30
बुलडाणा : चराई क्षेत्र कमी झाल्यामुळे मेंढपाळांना आपल्या मेंढ्यांना चारण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
- हर्षनंदन वाघ
बुलडाणा : चराई क्षेत्र कमी झाल्यामुळे मेंढपाळांना आपल्या मेंढ्यांना चारण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. राज्यात वनक्षेत्राची व्याप्ती एकूण भौगोलिक क्षेत्राच्या २० टक्के असली तरी ४८ वन विभागापैकी २७ वनविभागांमध्ये चराईक्षेत्र उपलब्ध नाही. तर उपलब्ध असलेल्या वनविभागात अतिक्रमण व वृक्ष लागवड करण्यात आल्यामुळे चराईक्षेत्र कमी झाल्यामुळे मेंढपाळ अडचणीत आले आहेत. राज्यात एकूण ४८ वनविभागांपैकी चराई क्षेत्र उपलब्ध नसलेल्या २७ वनविभागात अमरावती, पूर्व मेळघाट, पश्चिम मेळघाट, उस्मानाबाद, बीड, परभणी, अहमदनगर, पूर्व नाशिक, पश्चिम नाशिक, सोलापूर, भोर, पुणे, जुन्नर, ठाणे, जव्हार, शहापूर, रोहा, अलीबाग, डहाणू, मेवासी, यावल, जळगाव, भामरागड, ब्रम्हपूरी, चिपळूण, यवतमाळ, पांढरकवाड या वनविभागाचा समावेश आहे. तर चराईक्षेत्र उपलब्ध असलेल्या २१ वनविभागात बुलडाणा, वर्धा, भंडारा, नागपूर, गोंदिया, औरंगाबाद, नांदेड, पश्र्चिम धुळे, उत्तर धुळे, सिरोंचा, आलापल्ली, मध्यचांदा, गडचिरोली, वडसा, चंद्रपूर, सावंतवाडी, सातारा, कोल्हापूर, अकोला, सांगली आणि पूसद या विभागांचा समावेश आहे. चराईक्षेत्र उपलब्ध असेल्या २१ वनविभागात मागिल काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. याशिवाय शासनाच्या वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गंत वनविभागाच्या अनेक परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे चराईक्षेत्र मोठ्या प्रमाणात झपाट्याने कमी झाल्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील मेंढपाळ अडचणीत आले आहेत.
चराई पासेस देण्यास टाळाटाळ
मेंढपाळांना आपल्या तालुक्यातील वनविभागाच्या चराईक्षेत्रात मेंढ्या चारण्यासाठी पासेसची गरज आहे. मात्र चराईक्षेत्र कमी झाल्यामुळे वनविभागाचे अधिकारी पुरेसे पासेस उपलब्ध करून देत नाहीत. त्यामुळे मेंढपाळ अडचणीत आले आहेत. शासनाच्या २ जानेवारी २०१७ च्या आदेशान्वये ३ हजार पेक्षा जास्त मेंढी संख्या असलेल्या तालुक्यांसाठी वनक्षेत्रात वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गंत घोषित संरक्षित क्षेत्र वगळून मेंढी चराई परवाने देणे आवश्यक आहे. मात्र चराईक्षेत्र कमी झाल्यामुळे चराई पासेस देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे.
आजरोजी प्रत्येक मेंढपाळाजवळ कमीत कमी १० तर जास्तीत जास्त ३०० मेंढ्या आहेत. यासाठी वनविभागाकडून चराईक्षेत्रात मेंढ्या चारण्यासाठी परवानगी पासेस आवश्यक आहेत. मात्र वनविभागाकडून एका मेंढपाळास फक्त ४ चराई पासेस देण्यात येत आहेत. त्यामुळे मेंढ्या चारण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे.
-धोंडीराम गोयकर, मेंढपाळ, रा.ईसालवाडी ता. मोताळा जि.बुलडाणा.