राजूर घाटात ट्रक चालकाच्या प्रसंगावधानाने मोठा अपघात टळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 06:42 PM2021-05-22T18:42:46+5:302021-05-22T18:43:16+5:30
Rajur Ghat Accident : ट्रक चालकाने मोठ्या शिताफीने नियंत्रीत करत चालकाने स्वत:चे प्राण वाचविण्यासोबतच ट्रकचे मोठे नुकसान टाळले.
बुलडाणा: राजूर घाटात ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने अनियंत्रित झालेला ट्रक चालकाने मोठ्या शिताफीने नियंत्रीत करत चालकाने स्वत:चे प्राण वाचविण्यासोबतच ट्रकचे मोठे नुकसान टाळले. सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेदरम्यान सुदैवाने घाटामध्ये फारशी वाहतूक नसल्याने मोठा अनर्थ टळला.
जालना येथून आग्रा येथे बाजरीचे बियाणे घेऊन महेंद्रसिंग नामक ट्रक चालक जात होता. समुद्र सपाटीपासून २१९० फूट उंचीवर असलेल्या बुलडाणा शहरालगत असलेल्या राजूर घाटात सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास ट्रकच्या ब्रेकमधील वायसर खराब झाल्याने ट्रकचे ब्रेक लागत नव्हते. त्यामुळे उतारावर हा ट्रक अनियंत्रित झाला. त्यातच राजूर घाटातील हनुमान मंदिरानजीक जवळपास ८० अंशामध्ये असलेले वळण समोरच असल्याने हा ट्रक सुमारे ४०० फुट दरीत कोसळतो की काय? अशी भीती निर्माण झाली होती. मात्र ट्रक चालक महेंद्रसिंग याने कल्पकता लढवत मंदिरानजीकच्या संरक्षक कठड्यावर ट्रक धडकवला. त्यामुळे संरक्षक कठड्याचे मोठे नुकसान झाले असले तरी चालकाचे प्राण वाचण्यासोबतच ट्रकही दरीत कोसळता कोसळता वाचला. काही स्थानिकांनी हा थरारक प्रसंग स्वत: बघितला. सुदैवाने या घटनेच कुठलीही प्राणहानी झाली नाही. ट्रकाची काही चाके ही संरक्षक कठड्यात अडकल्याने मोठा अपघात टळला.
या अपघाताचे वृत्त कळताच बुलडाणा पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक विनायक रामोड व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले व घाटातील वाहतूक सुरळीत केली.