क्षयरोगमुक्त जिल्ह्यासाठी ‘डॉट्स सेंटर’वर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 06:03 PM2018-09-07T18:03:37+5:302018-09-07T18:03:58+5:30
जिल्ह्यातील महत्वाच्या खाजगी डॉक्टरांकडे ‘डॉट्स सेंटर’ उपलब्ध करून देण्याच्या हालचाली सुरू आहेत.
बुलडाणा: जिल्हा क्षयरोग मुक्त करण्यासाठी क्षयरोग केंद्राकडून विविध उपाययोजना हाती घेण्यात आलेल्या आहेत. सध्या जिल्ह्यातील दोन हजार ८०० क्षयरुग्णांवर मोफत उपचार सुरू असून आता जिल्ह्यातील महत्वाच्या खाजगी डॉक्टरांकडे ‘डॉट्स सेंटर’ उपलब्ध करून देण्याच्या हालचाली सुरू आहेत. खाजगी डॉक्टरांकडे उपचार सुरू असलेल्या क्षयरुग्णाची माहिती जिल्हा क्षयरोग केंद्राला न दिल्यास त्या डॉक्टरांवर कारवाई होणार आहे.
दुर्धर समजल्या जाणारा क्षयरोग बरा होणारा आजार आहे. मात्र या आजाराबद्दल अद्यापही जागृती दिसून येत नाही. क्षयरुग्णांवर उपचार करण्यासाठी शासनाकडून वारंवार नवनविन उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. जून महिन्यात जिल्हाभर क्षयरुग्ण शोध मोहीम व तपासणी करण्यात आली. जिल्ह्यात दोन हजार ८०० क्षयरुग्णांवर सध्या मोफत उपचार सुरू असून त्यांना पोषण आहारासाठी प्रत्येक महिन्याला ५०० रुपये देण्यात येत आहेत. आता १ सप्टेंबरपासून जिल्ह्यातील सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत खाजगी दवाखाने व मेडीकलवर ‘डॉट्स सेंटर’ उपलब्ध करून देण्यात येत आहे. बुलडाणा शहरात तीन ठिकाणी डॉट्स सेंटर सुरू करण्यात आले आहे. खाजगी दवाखान्यात असलेल्या डॉट्स सेंटरवर क्षयरुग्णांवर मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक शहराच्या ठिकाणी महत्वाच्या खाजगी दवाखान्यामध्ये ‘डॉट्स सेंटर’ देण्याच्या हालचाली जिल्हा क्षयरोग केंद्रावर चालू आहेत. खाजगी औषध विक्रेत्यांना डॉट्स प्रोव्हायडर म्हणून कॅट एकचे एक हजार व कॅट दोनचे १ हजार ५०० क्षयरुग्णांचा औषध उपचार पूर्ण केल्यावर औषध विक्रेत्यांना मानधन देण्यात येणार आहे. खाजगी डॉक्टरांकडे उपचारासाठी येणाºया क्षयरुग्णाची माहिती जिल्हा क्षयरुग्ण केंद्रास दिल्यास संबंधीत डॉक्टराला एक हजार रुपये देण्यात येणार आहेत. मात्र डॉक्टरांनी माहिती दिली नाही, तर भारतीय दंड विधान (१८६० चे ४५) २६९ व २७० नुसार कारवाई करण्यात येणार आहे. यामध्ये क्षयरुग्णाची माहिती न देणाºया डॉक्टरवर दंड किंवा शिक्षाही होऊ शकते.
डॉक्टरांची सीएमई
राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील खाजगी डॉक्टरांसाठी नुकतीच खामगाव येथे सीएमई घेण्यात आली. यामध्ये जवळपास ६० डॉक्टरांना मागदर्शन करण्यात आले. क्षयरोग मुक्तीसाठी करण्यात येणाºया प्रयत्नांची पूर्ण माहिती औरंगाबाद येथील डॉक्टरांनी यावेळी दिली.
रुग्ण शोधल्यास ५०० रुपये
क्षयरुग्णांचे प्रमाण कमी करण्यासाठी व जिल्ह्यात असलेल्या प्रत्येक रुग्णांपर्यंत मोफत उपचार पोहचविण्यासाठी जिल्हा क्षयरोग केंद्राकडून विविध उपापयोजना करण्यात येत आहेत. त्यामध्ये खाजगी वैद्यकीय व्यावसायीकांनी टी.बी.चा रुग्ण शोधल्यास ५०० रुपये देण्यात येतील अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकाºयांनी दिली आहे.
जिल्हा क्षयरोग मुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू असून जिल्ह्यातील खाजगी दवाखान्यामध्ये डॉट्स सेंटर उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सध्या बुलडाणा शहरात तीन ठिकाणी सेंटर देण्यात आले आहेत. या सेंटरवर क्षरुग्णांसाठी मोफत उपचार करून देण्यात येतील.
-डॉ.मिलींद जाधव, जिल्हा क्षयरोग अधिकारी, बुलडाणा.