तुपकरांनी स्वीकारला अध्यक्षपदाचा पदभार
By admin | Published: May 15, 2015 01:09 AM2015-05-15T01:09:42+5:302015-05-15T01:09:42+5:30
शनिवारी बुलडाण्यात आगमन.
बुलडाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांची महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाच्या अध्यक्षपदावर नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी १४ मे रोजी रितसर मुंबई येथे आपल्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकार व पणन मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खा. राजू शेट्टी, संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, भाजप नेते आ. भाऊसाहेब फुंडकर, आ. चैनसुख संचेती, आ. संजय कुटे उ पस्थित होते. शेतकरी हितासाठी अविरत संघर्ष करणारे व आपल्या आक्रमक शैलीच्या आंदोलनाने केवळ जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात परिचित झालेले रविकांत तुपकर यांना अखेर लाल दिवा मिळाल्याने त्यांचे चाहते व कार्यकर्त्यांमध्ये आनंदोत्सव साजरा होत आहे. १६ मे रोजी तुपकर यांचे जिल्ह्यात आगमन होणार आहे. रविकांत तुपकर यांचे सोयाबीन कापूस प्रश्नावरील आंदोलने, सावकार विरोधी आंदोलने, दुष्काळ दिलासा यात्रा अशा प्रकारच्या विविध आंदोलनाने रविकांत तुपकर यांनी महाराष्ट्रभर शेतकर्यांचे प्रश्न लावून धरले होते. विदर्भातील शेतकरी चळवळ बळकट करण्यास त्यांचा मोठा वाटा आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काढलेल्या एल्गार यात्रेच्या उंद्री येथील समारोप प्रसंगी प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी शेतकरी हितासाठी झटणार्या रविकांत तुपकर यांना लाल दिवा देऊ, असा शब्द दिला होता. हा शब्द पाळत तुपकरांना लाल दिवा मिळाला आहे.