अखेर बुलडाणा जिल्ह्यात पोहोचली तूर डाळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 12:22 PM2020-06-03T12:22:11+5:302020-06-03T12:22:30+5:30
एप्रिल महिन्याच्या नियतनातील डाळीचे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात मे महिन्याच्या अखेरीस वितरण सुरळीत झाल्याचे दिसून येते.
- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतंर्गत जिल्ह्यातील ४३ हजार २७१ लाभार्थ्यांना एप्रिल महिन्याचे नियतन म्हणून वितरीत येणारी तूर आणि हरभरा डाळ आता जिल्ह्यातील बहुतांश गोदामात पोहोचली आहे. एप्रिल महिन्याच्या नियतनातील डाळीचे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात मे महिन्याच्या अखेरीस वितरण सुरळीत झाल्याचे दिसून येते.
कोरोना संचारबंदी काळात पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतंर्गत लाभार्थ्यांना एप्रिल ते जून तीन महिन्याच्या कालावधीत कार्डनिहाय एक किलो तूर अथवा चणा डाळ वितरीत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, बुलडाणा जिल्ह्यात मे महिना संपेपर्यंत अनेक ठिकाणी डाळ पोहोचली नव्हती. तर नांदुरा, मलकापूर आणि शेगाव येथे पोहोचविण्यात आलेली डाळ निकृष्ट दर्जाची असल्याचे समोर आले होते.
जिल्ह्यात ४७ हजारावर लाभार्थी
बुलडाणा जिल्ह्यातील अंत्योदय कार्ड योजना आणि प्राधान्य कुटूंब योजनेचे ४३ हजार २७१ लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांना मोफत डाळ वितरणासाठी पुरवठा विभागाकडून नियोजन करण्यात आले. मात्र, नियोजनाच्या अभावामुळे एप्रिल महिन्याचे नियतन असलेली डाळ काही ठिकाणी पोहोचलेली नसल्याने लाभार्थ्यांमध्ये रोष व्यक्त होत होता. ही बाब ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणली. त्यानंतर जिल्ह्यात डाळीचे वितरण सुरू झाले. हे येथे उल्लेखनिय!
२५८० क्विंटल हरभरा डाळीचे नियतन
पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतंर्गत जिल्ह्यातील ४३ हजार २७१ लाभार्थ्यांना वितरीत करण्यासाठी २५८० क्विंटल हरभरा डाळीचे नियतन मंजूर करण्यात आले आहे. तर १७२० क्विंटल तूर डाळीचे नियतन एप्रिल महिन्यासाठी मंजूर आहे. ही डाळ जिल्ह्यात पोहोचण्यास विलंब झाला. दरम्यान, जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात आला तूर आणि काही ठिकाणी हरभरा डाळ पोहोचली. घाटाखालील खामगाव, मलकापूर, नांदुरा, शेगाव येथे डाळीचे वितरण सुरू झाले.