तुरीला एकरी केवळ तीन ते चार क्विंटलचा उतारा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:30 AM2021-01-13T05:30:24+5:302021-01-13T05:30:24+5:30
चिखली तालुक्यात सर्वत्र तुरीचा काढणीहंगाम अंतिम टप्प्यात आहे. यंदाच्या खरिपात तालुक्यात सोयाबीननंतर दुसऱ्या क्रमांकावर तुरीची लागवड केली होती. तालुक्यातील ...
चिखली तालुक्यात सर्वत्र तुरीचा काढणीहंगाम अंतिम टप्प्यात आहे. यंदाच्या खरिपात तालुक्यात सोयाबीननंतर दुसऱ्या क्रमांकावर तुरीची लागवड केली होती. तालुक्यातील एकूण ८९ हजार हेक्टर लागवड क्षेत्रापैकी ६७ हजार हेक्टरवर सोयाबीन, १५ हजार हेक्टरवर तुरीची लागवड झाली होती. सततच्या पावसामुळे सोयाबीन या प्रमुख पिकाला मोठा फटका बसला. त्यापाठोपाठ तूर पिकाला धुईचा फटका बसला. पीक ऐन भरात असताना अचानक थंडी गायब झाली. कडक उन्हामुळे तुरीचे शेंडे कोमजून गेले, फुले गळाली, काही भागात मररोगाचा प्रादुर्भाव झाला. परिणामी पिके बहारदार दिसत असतानाही शेंगा परिपक्व झाल्या नाहीत. त्यामुळे तुरीच्या उत्पन्नात ५० टक्के घट येत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. तालुक्यातील शेतकरी सध्या तूर कापणीत व्यस्त आहेत. हलक्या प्रतीच्या जमिनीवरील तूर काढणीत एकरी कुठे एक ते दीड, तर कुठे दोन क्विंटल उत्पन्न येत आहे. चांगल्या प्रतीच्या जमिनीवरील तुरीला तीन ते चार क्विंटल उतारा येत आहे.
दरात घसरण
काढणीपश्चात शेतकऱ्यांकडून बाजारात तूर विक्रीसाठी आणली जात आहे. त्यामुळे बाजारात तुरीची आवक वाढली आहे. आवक वाढताच भावातही घसरण झाली आहे. सुरुवातीला ६ हजार रुपये क्विंटल नुसार मिळणारा भाव आता साडेपाच हजारांपर्यंत घसरला आहे. तुरीत ओलावा असल्याचे कारण व्यापाऱ्यांकडून पुढे केले जात आहे. परिणामी उत्पन्नासह दरातील घसरणीचाही फटका शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे.