स्वबळामुळे सभापती निवडणूक अडचणीत
By Admin | Published: October 2, 2014 11:58 PM2014-10-02T23:58:47+5:302014-10-02T23:58:47+5:30
विधानसभा निवडणुकीची समीकरणामुळे जिल्हा परिषदेच्या सभापती पदाची निवडणूक अडचणीत आली आहे.
बुलडाणा : जिल्हा परिषद अध्यक्ष- उपाध्यक्ष पदाची निवडणूक २१ सप्टेंबर रोजी पार पडली. या निवडणुकीत काँग्रेस आघाडीने एकसंघता कायम ठेवत ही दोन्ही पदे जिंकली. या निवडणुकीदरम्यान राज्यस्तरावरील आघाडी दुभंगली गेली व आता या प्रकारामुळे जिल्हा परिषद विषय समिती सभापती पदाची निवडणूक अडचणीत आली आहे. बांधकाम, समाजकल्याण, महिला बालकल्याण व कृषी, पशुसंवर्धन या चार सभापती पदांसाठी ही निवडणूक होणार आहे. काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीतील तडजोडीप्रमाणे बांधकाम आणि समाजकल्याण ही पदे काँग्रेसकडे, तर महिला बालकल्याण व कृषी सभापती ही पदे राष्ट्रवादीकडे देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल पाहता काँग्रेस व मित्रपक्षांकडे आता २९ सदस्य झाले आहे. त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादीसोबतची आघाडी कायम राहिली नाही तर जिल्हा परिषदेमधील गणिते नव्याने मांडावी लागतील.
दरम्यान, सभापती पदांची अदालाबदल करण्याचेही संकेत सूत्रांनी दिले असून, सभापती पदाच्या शर्य तीमध्ये अनेक जि.प. सदस्य उतरले आहेत. थेट दिल्ली, मुंबईपर्यंत या पदांसाठी लॉबिंग केली जात असून, दसर्यानंतर सभापती पदाचं ह्यसोनंह्ण कुणाला मिळणार, याची उत्सुकता लागून आहे.
आघाडी आणि महायुती दुभंगल्यामुळे सध्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात स्वबळाची भाषा सर्वत्र आहे. या निवडणुकीच्या रणधुमाळीतच येत्या ४ ऑक्टोबरला जि.प. सभापती पदाची निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीत स्वबळाचे बळ आजमावण्याची संधी काँग्रेसला आहे; मात्र तसे न झाल्यास विधानसभा निवडणुकीत एकमेकांविरोधात चिखलफेक करणार्या काँग्रेस-राष्ट्रवादीला मिनी मंत्रालयात मात्र पुन्हा आघाडीचा सूर आळवावा लागेल, अशीच परिस्थिती भाजपा-सेनेची आहे.