घरफोडीतील दोन आरोपींना अटक
By admin | Published: September 24, 2015 01:26 AM2015-09-24T01:26:04+5:302015-09-24T01:26:04+5:30
चोरीच्या ५६ हजार रुपयांच्या मुद्देमाल केला हस्तगत.
अमडापूर (जि. बुलडाणा) : येथील केशवनगरात चोरट्यांनी घराच्या दरवाज्याचे कुलूप तोडून घरातील साहित्य व रोख रक्कम असा ५३ हजारांचा माल लंपास केल्याची घटना १७ ते २१ सप्टेंबर दरम्यान घडली. याप्रकरणी जळगाव (खा.) येथे स्थानिक पोलिसांनी १९ सप्टेंबर रोजी दोन चोरट्यांना अटक केली होती. त्यांनी अमडापूर येथे केलेल्या चोरीची कबुली दिली. यानंतर २१ सप्टेंबर रोजी अमडापूर पोलिसांनी जळगाव येथून दोन्ही चोरट्यांना चोरीच्या मालासह ताब्यात घेतले. अमडापूर येथील अशोक भैयालाल पचेरवाल हे कुटुंबासह १७ ते २१ सप्टेंबर दरम्यान बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी या दरम्यान त्यांच्या घराचे दार तोडून घरातील दोन फ्रीज, कलर टीव्ही, दोन गॅस सिलिंडर, सोन्याचे मणी तसेच सहा हजार रुपये रोख असा ५६ हजार रुपयांचा माल लंपास केला होता. याप्रकरणी अमडापूर पोलिसांनी पचेरवाल यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध भादंविच्या कलम ४५४, ४५७, ३८0 अन्वये गुन्हा दाखल केला होता. तपास सुरू असताना जळगाव खान्देश येथे सागर भीमराव देशमुख (२२) आणि राहुल अशोक केळोद (रा. अमडापूर) या दोघांना जळगाव पोलिसांनी १९ सप्टेंबर रोजी अटक केली. त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी अमडापूर येथे झालेल्या घरफोडीची कबुली दिली. यानंतर २१ सप्टेंबर रोजी अमडापूर पोलिसांनी जळगाव येथे जाऊन चोरीच्या ५६ हजार रुपयांच्या मालासह दोन्ही चोरट्यांना ताब्यात घेतले. दोन्ही चोरट्यांना २३ सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर करण्यात आले होते. आरोपींना २८ सप्टेंबरपर्यंंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.