अडीच हजाराचे सीटी स्कॅन होते साडेचार हजारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 11:13 AM2021-04-01T11:13:38+5:302021-04-01T11:13:56+5:30
Khamgaon News काही खासगी केंद्र ३५०० ते ४५०० रुपये शुल्क वसूल करीत असल्याच्या तक्रारी आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : कोरोनाच्या आजाराची भीती व त्यावरील उपचार हे मोठे संकट असल्यासारखे प्रत्येकाला वाटत आहे. काही खासगी इस्पितळातील लूट आणि शासकीय रुग्णालयात नेल्यास रुग्ण जीवानिशी जाण्याची भीती या कात्रीत आज शहरातील सर्व गरीब व मध्यमवर्गीय सापडले आहेत.
विशेष म्हणजे, राज्य सरकारने कोरोना रुग्णांसाठी खासगी केंद्रामध्ये सीटी स्कॅनचा दर निश्चित केला आहे. २५०० रुपयांपेक्षा जास्त दर आकारू नये असे निर्देशही दिले आहेत. असे असताना, काही खासगी केंद्र ३५०० ते ४५०० रुपये शुल्क वसूल करीत असल्याच्या तक्रारी आहेत.
बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. मृत्यूचा दरही वाढत असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कोरोना विषाणू फुप्फुसांना पोखरत असल्याने डॉक्टर कोरोनाबाधित रुग्णांना छातीचा ‘एचआर सीटी स्कॅन’ करण्याचा सल्ला देतात. मागील वर्षी याचा फायदा काही खासगी केंद्र घेत असल्याच्या तक्रारी झाल्या. राज्यात सीटी स्कॅन चाचणीचे दर निश्चित करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समिती नेमली.
या समितीने खासगी केंद्रांना कोरोना रुग्णांच्या एच.आर. सीटी स्कॅनसाठी जास्तीतजास्त २५०० रुपये दर आकारण्याचे निर्देश दिले. परंतु मोजकेच काही केंद्र सोडता बहुसंख्य केंद्र याच्या दुपटीने रक्कम रुग्णांकडून वसूल करीत असल्याचे दिसून येत आहेत. याबाबतची माहिती पालिकेच्या काही अधिकाºयांना आहे. परंतु कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने वैद्यकीय तज्ज्ञांनी सीटीस्कॅन करण्याचा सल्ला दिला. यासाठी वडिलांना नांदुरा रोडवरील एका रुग्णालयात भरती करण्यात आले. या रुग्णालय व्यवस्थापनाने सीटी स्कॅनसाठी साडेचार हजार रुपये शुल्क आकारले.
- रवींद्र पाटील, खामगाव.