बुलढाणा जिल्ह्यात लम्पी स्कीनमुळे दोन जनावरांचा मृत्यू
By भगवान वानखेडे | Published: September 8, 2022 04:19 PM2022-09-08T16:19:42+5:302022-09-08T16:20:02+5:30
जिल्ह्यातील पशुधनासाठी घातक संकट समजल्या जाणाऱ्या 'लम्पी स्किन' या आजाराचा जिल्ह्यातील प्रादुर्भाव झाला असून, आतापर्यंत ८९ जनावरांना याची लागण झाली आहे. यातील दोघांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.
बुलढाणा :
जिल्ह्यातील पशुधनासाठी घातक संकट समजल्या जाणाऱ्या 'लम्पी स्किन' या आजाराचा जिल्ह्यातील प्रादुर्भाव झाला असून, आतापर्यंत ८९ जनावरांना याची लागण झाली आहे. यातील दोघांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.
या आजाराने शेगाव, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, मलकापूर, जळगाव व मोताळा या तालुक्यापर्यंत शिरकाव केला आहे. शेगाव तालुक्यात सर्वाधिक जनावरे बाधित झाली आहे. याशिवाय देऊळगाव राजा व जळगाव जामोद, मलकापूर, मोताळा अशी तालुकानिहाय बाधित जनावरांची संख्या आहे. सिंदखेड राजातही आजाराचा प्रादुर्भाव झाला असून, त्याचा अहवाल मिळणार असल्याचे पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर आर.एस. पाटील यांनी सांगितले. आजअखेर दोन जनावराचा मृत्यू झाल्याची माहितीही त्यांनी दिली.
गुरांचे बाजार तुर्तास बंद
लसीकरणाला गती देण्यात आली आहे. आयुक्त आणि जिल्हाधिकारी एस.रामामुर्ती यांच्या मार्गदर्शनात व बाजार समित्यांच्या सहकार्याने तूर्तास गुरांचे बाजार बंद ठेवण्यात आले आहे. यामध्ये देऊळगावराजा, खामगाव , मोताळा, मलकापूर, चिखली , आसलगाव(जळगाव) दुधा( बुलढाणा,) या मुख्य बाजारांचा समावेश आहे. अधिनस्थ अधिकारी, कर्मचारी व पशु चिकित्सा केंद्रांना सतर्क करण्यात आल्याचे डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले.
४९ जनावरे आजारातून बरे
जिल्हा पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात ८९ जनावरे लम्पी स्किनने बाधित झाले आहेत. यापैकी ४० जनावरांवर उपचार सुरु असून,४९ जनावरे उपचारानंतर बरे झाले आहेत. तर आतापर्यंत ८ हजार ५०० जनावरांचे लसीकरण झाले असून, पुढील दिवसांसाठी जिल्हा परिषद आणि पशुसंवर्धन विभागाकडून लस मागविण्यात आली आहे.
पशुपालकांनी या दिवसांत गुरांची काळजी घेणे गरजेचे आहे. हा आजार संसर्गजन्य असल्याने पशुसंवर्धन विभागाकडून सांगितलेल्या सुचनाचे पालन करावे.
-डॉ. राजेंद्र पाटील, सहाय्यक पशुसंवर्धन अधिरारी, बुलढाणा.