उपमुख्यमंत्री शिंदे यांना धमकी देणाऱ्या दोघांना अटक

By निलेश जोशी | Updated: February 21, 2025 12:36 IST2025-02-21T12:35:55+5:302025-02-21T12:36:20+5:30

उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या वाहनाला बॉम्बने उडवण्याची धमकी २० फेब्रुवारी रोजी मुंबईतील काही पोलिस ठाण्यांना मिळाली होती.

Two arrested for threatening Deputy Chief Minister Eknath Shinde | उपमुख्यमंत्री शिंदे यांना धमकी देणाऱ्या दोघांना अटक

उपमुख्यमंत्री शिंदे यांना धमकी देणाऱ्या दोघांना अटक

बुलढाणा: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिंदे सेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांचे शासकीय वाहन बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिल्याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव मही येथून दोघांना २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेले दोघेही नात्याने ‘आतेभाऊ-मामभाऊ’ असल्याचे समजते.

उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या वाहनाला बॉम्बने उडवण्याची धमकी २० फेब्रुवारी रोजी मुंबईतील काही पोलिस ठाण्यांना मिळाली होती. या प्रकरणी गोरेगाव (मुंबई) पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मंगेश अच्युतराव वायाळ (३५), अभय गजानन शिंगे (२२, रा. देऊळगाव मही, जि. बुलढाणा) अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. मंगेश हा ट्रक चालक असून, अभयचे मोबाईल शॉप असल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक तपासानुसार, या दोघांनी आपसातील वादातून एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या उद्देशाने हे कृत्य केले असावे, असा पोलिसांचा संशय आहे. तथापि, या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे.

गोरेगाव पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन मुंबईला नेले असून तेथे त्यांची चौकशी सुरू आहे. सार्वजनिक सेवकाला त्याच्या कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी धमकी दिल्याच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

मंगेशच्या मोबाईलचा वापर

या प्रकरणात अभयने मंगेशच्या मोबाईलचा वापर केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. मात्र, हा मुद्दा संवेदनशील असल्याने पुढील तपासात पोलिसांची भूमिका काय असेल, याकडे लक्ष लागले आहे.

Web Title: Two arrested for threatening Deputy Chief Minister Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.