चारचाकीतून गाय पळवणाऱ्यांनी दोघांना उडवले, गायी चोरीच्या घटनांमुळे दहशत
By सदानंद सिरसाट | Published: February 3, 2024 04:10 PM2024-02-03T16:10:11+5:302024-02-03T16:10:29+5:30
याप्रकरणी ऋषिकेश दिलीप डवंगे (२३) यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून शहरातून गायींची चोरी होत असल्याच्या घटना वाढल्या आहेत.
खामगाव (बुलढाणा) : शहरातील विविध भागांतून गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात गायींची चोरी होत असल्याचे प्रकार घडत आहे. त्यावर पाळत ठेवून गाय चोरी रोखण्यासाठी पुढे आलेल्या दोघांना चारचाकीने उडवून जखमी केल्याची घटना शनिवारी (दि. ३) पहाटे २.४५ वाजता घाटपुरी नाका परिसरात घडली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांत अज्ञात चार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी ऋषिकेश दिलीप डवंगे (२३) यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून शहरातून गायींची चोरी होत असल्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रीय गोसेवा संघाच्या माध्यमातून हा प्रकार रोखण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. गोसेवा संघाचे सदस्य रात्री शहरात गस्त घालत असतात. त्यानुसार शनिवारी रात्री घाटपुरी परिसरात पांढऱ्या रंगाची चारचाकी गाडी संशयास्पदरीत्या फिरत असल्याचे आढळून आले. त्या गाडीचा शोध घेण्यासाठी विशाल बारकिया, अभिषेक रत्नपारखी, गजानन लाड यांच्यासोबत त्यांनी धाव घेतली. त्यावेळी करवीर काॅलनीतील शिवमंदिराजवळ ३० ते ३५ वयोगटातील चार युवक गायीला घाईघाईने गाडीत टाकून बसत असल्याचे दिसले. त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी वाहनाचा वेग वाढवला. तसेच त्यांच्यासह मित्र बारकिया यांना धडक दिली. चालकाजवळ बसलेल्याने अज्ञाताने आता फक्त वाहनाची धडक दिली. पुढच्या वेळी जिवाने मारण्याची धमकी दिल्याचे म्हटले. त्या धडकेत दोघेही जखमी झाले. यावेळी आरडाओरडीने नागरिक जमा झाले. परिसरातील अजित बेगानी यांनी त्यांच्या गायीचे वर्णन सांगितले. त्यांनी घरासमाेर मोकळ्या जागेत गाय बांधलेली होती, त्या गायीची चोरी झाल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, जखमींना शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. शनिवारी सकाळी त्यांनी शिवाजीनगर ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून चार अज्ञात आरोपींवर भादंविच्या २७९, ३३७, ३७९, ५०६ (३४) तसेच मोटर वाहन कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस करीत आहेत.