कोरोनाग्रस्त दोन रूग्ण; चिखली तालुक्याच्या सर्व सीमा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 10:53 AM2020-04-06T10:53:56+5:302020-04-06T10:54:09+5:30
चिखली शहरात कोरोनाग्रस्त दोन रूग्ण आढळून आल्याने चांगलाच हादरा बसला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : कोरोनाबाबतीत आजवर सुरक्षित असलेल्या चिखली शहरात कोरोनाग्रस्त दोन रूग्ण आढळून आल्याने चांगलाच हादरा बसला आहे. या पृष्ठभूमीवर प्रशासकीय यंत्रणेने खबरदाराची उपाय म्हणून तालुक्याच्या सर्व सीमा बंद करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे यांनी दिले.
कोरोनाची लागण झालेले चिखली येथील दोन्ही रूग्ण दिल्ली येथील धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाले होते, अशी माहिती मिळतेय. कोरोना बाधीत रुग्णांकडून हा संसर्ग अन्यत्र वाढू नये, म्हणून तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात आल्या. त्यानुषंगाने ‘कन्टेनमेंट प्लॅन’ राबविण्यास प्रारंभ केला. संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या घरास केंद्रबिंदू माणून त्याच्या तीन किमी परिसरापर्यंत नागरिकांच्या हालचाली, फिरणे व संपर्कावर निर्बंध घालण्यात आले. चिखली येथील आपत्कालीन परिस्थिती नियंत्रणात राहावी, याकरीता ५ एप्रिल रोजी संपूर्ण चिखली शहराच्या सिमाही सील करण्यात आल्या आहेत. तालुक्यातून बाहेर जाण्यास व दुसऱ्याला तालुक्यात येण्यास मज्जाव घालण्यात आला आहे.
बुलडाणा रोड टी पॉर्इंट जांबवाडी, पळसखेड जयंती रोड, सवणा रोड, शेलूद गावाजवळ, खंडाळा रोडवरील वायझडी धरणावरील पूल, मेहकर फाटा टी पॉर्इंट, जाफ्राबाद रोडवरील रानवारा पर्यंत, साकेगाव रोडवर वरील एका हॉटेलपर्र्यंतचा भागाचा समावेश आहे.
४चिखली तालुक्याच्या सिमांसह शहरातील पालिका चौक, रोकडा हनुमान मंदीर, टिळक पुतळा, बैलजौडी चौक, रेणुकामाता मंदीर परिसर, फडके चौक, बाबुलॉज चौक परिसर, खैरूल्लाशाह बाबा दर्गाह, अंगूरचा मळा, माळीपुरा या अंतर्गत रस्त्यांसह राऊतवाडी चौक, आदर्श शाळेसमोर, रोहीदास नगर, डिपी रोड, भंगार गल्ली, जयस्तंभ चौक, कोहीनूर बुट हाऊस, डॉ.सराफ गल्ली व भिमनगर कमान, मौनीबाबा मठ, गोरक्षणवाडी, संभाजीनगर कमान, काझी मशीद, सैलानी नगर चौक, आधार हॉस्पीटल परिसर या भागात सिमाबंदी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
केवळ यांना राहणार मुभा
४शासकीय कर्तव्यावर असलेले अधिकारी व कर्मचारी यांना त्यांच्या अत्यावश्यक सेवेस्तव कार्यपालन करण्याची मुभा देण्यात आली आहे. यानुषंगाने पालिका मुख्याधिकारी यांनी अत्यावश्यक सेवा पुरवठाधारकांना परवाना अथवा पासेस पुरवाव्यात व त्यांची माहिती पोलीस स्टेशनला द्यावी, तथापी परवाना अथवा पास धारकांनी पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी नेमून दिलेल्या ठराविक वेळेतच वस्तूंचा पुरवठा करावा आणि आरोग्य विषयक नियमांचे पालन करावे, असे या आदेशात स्पष्ट आहे.