सराफा व्यवसायात दोन कोटींची उलाढाल ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 11:17 AM2020-04-15T11:17:12+5:302020-04-15T11:17:17+5:30
जवळपास दोन कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली असल्याची माहिती सराफा व्यावसायिकांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
- योगेश देऊळकार
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : ‘कोरोना’च्या पृष्ठभूमीवर लागू असलेल्या ‘लॉकडाउन’मुळे लग्न समारंभ रद्द करण्यात आले आहेत. यामुळे सोने खरेदी पूर्णपणे बंद असल्याने जिल्ह्यातील व्यावसायिकांना खूप मोठी झळ पोहचली आहे. परिणामी सराफा व्यवसायात दरवर्षी होणारी जवळपास दोन कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली असल्याची माहिती सराफा व्यावसायिकांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
दरवर्षी सर्वसाधारणपणे दिवाळीनंतर लग्न समारंभाला सुरुवात होते. मात्र यावर्षी कोरोना विषाणू संसर्गाने थैमान घातले. सुरुवातीला एकही रुग्ण नसलेल्या महाराष्ट्रात मार्च महिन्यात पहिला ‘कोरोना’ पॉझिटीव्ह रुग्ण आढळला आणि सर्वांच्या चिंतेत वाढ झाली. यानंतर या आजाराचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला असून राज्यातील ‘कोरोना’बाधितांचा आकडा दोन हजारांच्या वर पोहचला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात २३ मार्चपासून लॉकडाउन व संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे ऐन सीझनमध्येच ‘लॉकडाउन’ आल्याने जिल्ह्यात काही ठिकाणी लग्न समारंभ तूर्तास रद्द करण्यात आले आहेत.
लग्न समारंभ म्हटले की, सोने खरेदीला प्राधान्यक्रम दिल्या जातो. परंतु कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांकडून विशेष काळजी घेण्यात येत आहे. काही ठिकाणी सोने खरेदी न करताच अगदी साध्या पद्धतीने विवाह पार पडले. अनेकांनी कोरोना विषाणूचा संसर्ग आटोक्यात येईपर्यंत वाट पाहण्याचा मार्ग निवडला आहे. या सर्व परिस्थितीचा परिणाम सराफा व्यवसायावर झाला आहे. जिल्ह्यात दरवर्षी लग्न समारंभाच्या पृष्ठभूमीवर जवळपास २ कोटी रुपयांची उलाढाल होत असते; मात्र यावर्षी ही उलाढाल पूर्णपणे ठप्प झाल्याने व्यावसायिकांना खूप मोठी आर्थिक झळ पोहचली आहे.
‘कोरोना’ चा वाढता धोका पाहता राज्य शासनाने ‘लॉकडाउन’मध्ये वाढ केली आहे. सुरुवातील १४ एप्रिलपर्यंत असलेले ‘लॉकडाउन’ आता ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात आले आहे. ‘लॉकडाउन’ उठल्यानंतर बाजारपेठ सुरू होणार असली तरी, सोने खरेदीसाठी कोणीही येणार नसल्याने परिस्थिती सुरळीत होण्यास आणखी २ ते ३ महिन्यांचा कालावधी लागू शकतो.
- दीपक वर्मा,
सराफा व्यावसायिक, बुलडाणा.