भरधाव कारने दोघांना चिरडले, एकाचा मृत्यू, एक गंभीर; हिवरा आश्रम येथील घटना
By संदीप वानखेडे | Published: September 11, 2023 02:36 PM2023-09-11T14:36:39+5:302023-09-11T14:36:59+5:30
हिवरा आश्रम येथील रहिवाशी नसीर शहा वजीर शहा हे बसथांब्यावर दूचाकीने येत असताना चिखलीकडून येणाऱ्या भरधाव कार क्र.एम एच ३० एए २१६६ ने नसीर शहा यांना जबर धडक दिली.
हिवरा आश्रम : चिखलीकडून मेहकरकडे जाणाऱ्या भरधाव कारने दोघांना चिरडल्याची घटना रविवारी रात्री हिवरा आश्रम बस थाब्यावर घडली. यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले होते, त्यापैकी एकाचा सोमवारी सकाळी छत्रपती संभाजी नगर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. नसीर शहा वजीर शहा असे मृतकाचे नाव आहे.
हिवरा आश्रम येथील रहिवाशी नसीर शहा वजीर शहा हे बसथांब्यावर दूचाकीने येत असताना चिखलीकडून येणाऱ्या भरधाव कार क्र.एम एच ३० एए २१६६ ने नसीर शहा यांना जबर धडक दिली. पाणी आणण्यासाठी येथील राज अरुण मगरे(१९) हा बसथांब्यावर आपल्या दूचाकीने येत होता. त्यालाही कारने जबर धडक दिली. त्यांनतर सदर कार ही विरूद्ध दिशेने येऊन नालीला धडकली. यामध्ये दोन्ही दुचाकीसह कारचे नुकसान झाले आहे.
यातील जखमींना उपचाराकरिता मेहकर येथे दाखल केले असता जखमींपैकी नसीर शहा यांना उपचाराकरिता छत्रपती संभाजी नगर येथे पाठविण्यात आले. मात्र, उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने सोमवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. तर राज मगरे यांचेवर मेहकर येथे उपचार सुरु आहेत. राज हा विवेकानंद नर्सिंग महाविद्यालयाचा प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे. याप्रकरणी अद्याप तक्रार दाखल न झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला नाही.
सहा महिन्यात दुसरा अपघात
हिवरा आश्रम येथील बस स्थानकावर गेल्या सहा महिन्यात हा दुसरा अपघात आहे. यापूर्वी १० फेब्रुवारी २०२३ ला हिवरा आश्रम येथील अंगावरुन टेम्पो गेल्याने युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.तेव्हा या घटनेची पुनरावृत्ती होवू नये म्हणून बसथांब्यावर गतीरोधक बसविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती.