दोन ग्राहकांना एकच खाते क्रमांक
By admin | Published: April 24, 2015 01:34 AM2015-04-24T01:34:27+5:302015-04-24T01:34:27+5:30
मागील चार महिन्यांपासून दोन्ही खातेधारकांचा एकाच खात्यावर व्यव्हार.
मेहकर (जि. बुलडाणा) : येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेच्या अधिकार्यांच्या दुर्लक्षित कारभारामुळे एका शेतकर्याचा व एका विद्यार्थिनीचा शिष्यवृत्तीसाठी काढलेला बँक खाते क्रमांक सारखाच दिला गेल्याने गेल्या ३ ते ४ वर्षांपासून दोन्ही खातेदार एकाच खात्याच्या क्रमांकावर आपले व्यवहार करीत असल्याचे उघडकीस आले आहे. स्थानिक वार्ड क्र.११ मधील रहिवाशी शेतकरी शेख कादर शेख इमाम यांनी सन २0११ मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा मेहकर येथे आपले बँक खाते उघडले हो ते. त्यांचा खाते क्र.३१७२५२९७७२५ हा होता. अनेकवेळा त्यांनी यावर आपले व्यवहार केले. तसेच २१ जुलै २0१२ रोजी कृषी शाखेतून शेतीवर त्यांनी कर्जसुद्धा घेतले. त्यानंतर शेतकर्याच्या मुलाने बँक खाते पुस्तकाच्या व्यवहाराची प्रिंट काढली असता, या खाते क्रमांकावरून शिष्यवृत्तीचे व्यवहार झाल्याचे लक्षात आले. वार्ड क्र.११ मधील राहणार्या शेख कादर शे.कासम यांनी शिक्षण घेत असलेली त्यांची मुलगी आफरीन बानो शेख कादर, शे.कादर शे.कासम या दोघांच्या नावाने २0१२ मध्ये नवीन खाते उघडले; मात्र अधिकार्यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे आफरीन बानो शेख कादर यांनाही ३१७२५२९७७२५ हाच खाते क्रमांक देण्यात आला. आफरीन या विद्यार्थिनीने या खातेक्रमांकावरून शिष्यवृत्तीची रक्कम सुद्धा काढली. शेख कादर शे.इमाम या शेतकर्याच्या ही बाब लक्षात आल्याने त्यांनी बँक व्यवस्थापकाशी संपर्क साधल्यावर एकच खळबळ उडाली. दरम्यान, बँक व्यवस्थापकाने दोन्ही खाते बंद केले आहेत. याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी खातेधारकांनी २२ एप्रिल रोजी केली आहे.