बुलडाणा जिल्ह्यात दोन दिवस उष्णतेची लाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 11:09 AM2021-03-31T11:09:46+5:302021-03-31T11:10:07+5:30
Two-day heat wave in Buldana district : बुलडाणा जिल्ह्यात ३० व ३१ मार्चला तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : नागपूर येथील प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तविलेल्या अंदाजानुसार बुलडाणा जिल्ह्यात ३० व ३१ मार्चला तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यानुसार ३० मार्चला अनेक ठिकाणी उन्हाच्या झळा जाणवल्या.
उष्माघाताचा त्रास टाळण्यासाठी नागरिकांसह शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन स्थानिक कृषी विज्ञान केंद्रातील जिल्हा कृषी हवामान केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.
जिल्ह्यात सध्या रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू आहे. यामध्ये हरभरा, गहू व कांदा पिकाचा समावेश आहे. अधूनमधून ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने या पिकांची लवकरात लवकर काढणी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. यामुळे उन्हातदेखील शेतकरी मजुरांसह काम करताना दिसून येतात. मात्र हवामान विभागाने जिल्ह्यात ३० व ३१ मार्च असे दोन दिवस उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे शेतकरी बंधूंंनी उष्माघातापासून बचाव करण्यासाठी शेतातील कामे शक्यतो सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळेत करावी. जनावरांना सावलीत किंवा गोठ्यात बांधून ठेवावे, त्यांना पिण्यासाठी स्वच्छ, थंड पाण्याची व्यवस्था करावी, असा सल्ला कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांनी दिला आहे.