जिल्ह्यात दोन दिवस उष्णतेची लाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:35 AM2021-03-31T04:35:17+5:302021-03-31T04:35:17+5:30
बुलडाणा : नागपूर येथील प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तविलेल्या अंदाजानुसार बुलडाणा जिल्ह्यात ३० व ३१ मार्चला तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट ...
बुलडाणा : नागपूर येथील प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तविलेल्या अंदाजानुसार बुलडाणा जिल्ह्यात ३० व ३१ मार्चला तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. यामुळे उष्माघाताचा त्रास टाळण्यासाठी नागरिकांसह शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन स्थानिक कृषी विज्ञान केंद्रातील जिल्हा कृषी हवामान केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.
जिल्ह्यात सध्या रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू आहे. यामध्ये हरभरा, गहू व कांदा पिकाचा समावेश आहे. अधूनमधून ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने या पिकांची लवकरात लवकर काढणी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. यामुळे उन्हातदेखील शेतकरी मजुरांसह काम करताना दिसून येतात. मात्र हवामान विभागाने जिल्ह्यात ३० व ३१ मार्च असे दोन दिवस उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे शेतकरी बंधूंंनी उष्माघातापासून बचाव करण्यासाठी शेतातील कामे शक्यतो सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळेत करावी. जनावरांना सावलीत किंवा गोठ्यात बांधून ठेवावे, त्यांना पिण्यासाठी स्वच्छ, थंड पाण्याची व्यवस्था करावी, असा सल्ला कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांनी दिला आहे.
..........चौकट.........
घाटाखालील तालुक्यांना जास्त धोका
बुलडाणा जिल्ह्याचे घाटाखालील व घाटावरील असे दोन भागात वर्गीकरण करण्यात येते. यामुळे घाटाखालील भागात घाटावरील भागाच्या तुलनेत तापमान जास्त असते. अशातच जिल्ह्यातील तुरळक भागात दोन दिवस उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. यामुळे याचा जास्त धोका हा घाटाखालील तालुक्यांनाच असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
.......................