ऑटोत अवैध गॅस भरताना दोघे ताब्यात; उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाची कारवाई
By अनिल गवई | Published: March 23, 2023 04:13 PM2023-03-23T16:13:39+5:302023-03-23T16:13:58+5:30
खामगाव शहरातील शाळा क्रमांक २ मागील गवळी पुरा भागात दुपारी १ वाजता दरम्यान उप विभागीय पोलीस अधिकारी आणि महसूल पथकाने ही कारवाई केल्याचे समजते.
खामगाव: ऑटो रिक्षात घरगुती गॅसचा इंधन म्हणून मोठ्याप्रमाणात वापर करण्यात येत आहे. गत काही दिवसांपासून हे प्रमाण वाढीस लागले आहे. काही केल्या याला आळा बसत नसतानाच आॅटोत घरगुती गॅसचा इंधन म्हणून वापर करताना उपविभागीय पोलीसांनी दोघांच्या मुसक्या आवळत कारवाई केली आहे.
खामगाव शहरातील शाळा क्रमांक २ मागील गवळी पुरा भागात दुपारी १ वाजता दरम्यान उप विभागीय पोलीस अधिकारी आणि महसूल पथकाने ही कारवाई केल्याचे समजते. ऑटो रिक्षामध्ये इंधन म्हणून घरगुती गॅसचा वापर करताना सय्यद रिझवान सय्यद अमीर (४० रा. फाटक पुरा) आणि मोहम्मद अख्तार मो. मुस्तफा (४९ रा. बोरीपुरा) यांना रंगेहात पकडले आहे. दोघेही कॉम्प्रेसर मशीनच्या साहाय्याने घरगुती सिलींडरमधून वाहनात इंधन भरताना आढळून आले.
उपविभागीय पोलीस अधीक्षक अमोल कोळी यांच्या पथकाने ही कारवाई केली असून या कारवाईमध्ये पोलिसांनी २ भरलेले गॅस सिलेंडर, दोन खाली सिलीडरच्या टाक्यांसह एम एच ३० पी ६०७३ क्रमांकाचा ऑटो, वजन काटा, वजन काटा स्टॅन्ड, रबरी नळ्या, रेग्यूलेटर आणि इतर साहित्य असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईमुळे अवैध पणे घरगुती वापराच्या गॅसचा इंधन म्हणून सर्रासपणे वापर करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.